दादर येथील कोहिनूर टॉवरमधील वाहनतळाच्या जागेत उभारण्यात आलेल्या पहिल्या ड्राईव्ह ईन लसीकरणानंतर, आता मुंबईतील खुल्या मैदानांमध्ये अशाप्रकारची लसीकरण केंद्र उभारली जाणार आहेत. यासाठी मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न मैदानांसह मोठ्या क्रिडा संकुलाच्या जागांवर लसीकरण केंद्र उभारण्याचे निश्चित केले असून, यासाठी महापालिकेच्या संबंधित सर्व उपायुक्त तसेच सहाय्यक आयुक्तांना तातडीने केंद्र उभारण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
आयुक्तांच्या सूचना
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी गुरुवारी ड्राईव्ह ईन लसीकरणाबाबत परिपत्रक जारी करुन, याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश परिमंडळांच्या उपायुक्तांना दिले आहेत. यामध्ये पुढील २४ तासांमध्ये निश्चित केलेल्या एका जागेवर ड्राईव्ह ईन लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या केंद्राची रचना करताना वाहने एक मार्गी जातील अशाप्रकारे बॅरीकेट्स उभारणे, जेणेकरुन यामुळे कोणत्याही प्रकारे वाहनांची कोंडी होणार नाही. तसेच त्याठिकाणी पुरेशा प्रमाणात मोबाईल टॉयलेट बनवणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा राखणे अशा सूचना केल्या आहेत. तसेच या लसीकरण केंद्रांमध्ये ६० वर्षांवरील व्यक्तींचेच लसीकरण केले जाईल, ज्यांची कोविन अॅपवर नोंदणी असेल. तसेच लस घेणारी व्यक्ती ही स्वत: वाहन चालवत नसावी. चालक त्यांच्यासोबत असावा, अशाप्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
(हेही वाचाः ‘ड्राईव्ह इन’ लसीकरणाच्या उद्घाटनात महापौर ‘आऊट’!)
याठिकाणी होणार ड्राईव्ह ईन लसीकरण केंद्र
वानखेडे स्टेडियम
ब्रेबॉर्न स्टेडियम
अंधेरी स्पोर्ट कॉम्प्लेक्स,
कुपरेज मैदान
शिवाजी स्टेडियम
ओव्हल मैदान
एमआयजी ग्राऊंड
एमसीए ग्राऊंड
रिलायन्स जीओ ग्राऊंड
मुलुंड संभाजी उद्यान
चेंबूर सुभाष नगर ग्राऊंड
चेंबूर टिळक नगर ग्राऊंड
घाटकोपर पोलिस ग्राऊंड
चुनाभट्टी शिवाजी मैदान