‘दुबई हे काही आमचं घर नाही,’ – Rohit Sharma नेमका कुणावर चिडला?

भारताला सलग ३ सामने एकाच जागी खेळायला मिळाल्यामुळे टीका होत आहे.

58
‘दुबई हे काही आमचं घर नाही,’ - Rohit Sharma नेमका कुणावर चिडला?
‘दुबई हे काही आमचं घर नाही,’ - Rohit Sharma नेमका कुणावर चिडला?
  • ऋजुता लुकतुके

या चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy) हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यात आलं. आणि त्यानुसार, पाकिस्तानला जायला नकार दिलेल्या भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत होत आहेत. भारतीय संघ १५ तारखेपासून दुबईत डेरेदाखल झाला आहे. बाकीचे संघ मात्र आपापल्या सामन्यानुसार, कराची, रावळपिंडी, लाहोर आणि दुबई असा प्रवास करत आहेत. यात एकाच जागी, एकाच मैदानावर खेळल्याचा फायदा भारतीय संघाला मिळत असल्याबद्दल इतर देश काहीसे नाराज आहेत. खेळाडूंनी उघडपणे टीकाही केली आहे.

या टीकेला भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) उपान्त्य सामन्यापूर्वी पहिल्यांदा उत्तर दिलं. खासकरून पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू या गोष्टीवर वारंवार टीका करत आहेत. या टीकेला थेट उत्तर देताना रोहित (Rohit Sharma) म्हणतो, ‘इथं खेळून बघा. इथल्या तीनही सामन्यांत खेळपट्टीने आपले वेगवेगळे रंग दाखवले आहेत. प्रत्येक दिवशी खेळपट्टी वेगळं वागत होती. हे काही आमचं घर नाही. हे दुबई आहे. आणि इतर संघांइतकंच आम्हाला नवीन आहे. आम्ही काही इथे वरचे वर खेळत नाही.’

(हेही वाचा – Champions Trophy, Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्ध चक्रवर्तीला खेळवायचं की हर्षित राणाला, भारतासमोरचा प्रश्न)

या सडेतोड उत्तरानंतर मात्र रोहितने दुबईत खेळण्यावरील प्रश्न टाळले. आणि पत्रकारांनाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपान्त्य सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सुनावलं. या सामन्यातही खेळपट्टीच निर्णायक असेल. आणि जो संघ तिच्याशी लवकरात लवकर जुळवून घेईल, तो संघ विजेता ठरण्याची शक्यता जास्त आहे, असं रोहितला (Rohit Sharma) वाटतं.

‘एकूण ४ ते ५ खेळपट्ट्या मैदानात तयार आहेत. त्यातली नेमकी कुठली वापरणार हे आम्हालाही ठाऊक नाही. आतापर्यंतची प्रत्येक खेळपट्टी वेगळी होती. पहिल्या सामन्यात गोलंदाजांना स्विंग मिळत होता. तो पुढील सामन्यात गायब झाला. सुरुवातीला चेंडू फारसे वळत नव्हते. न्यूझीलंडविरुद्घ (New Zealand) ते चांगलेच वळायला लागले. अशी या खेळपट्टीची गंमत आहे,’ असं रोहित (Rohit Sharma) म्हणाला. प्रतिस्पर्धी म्हणून ऑस्ट्रेलियाला (Australia) कमी लेखून चालणार नाही, याची तर त्याला पुरेपूर कल्पना आहे.

‘आम्ही ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध खेळणार आहोत. त्यामुळे सामन्यात अचानक आमचा खूप कस लागेल. आमची परीक्षा पाहणारे क्षण येतील. आणि काही क्षणी न झेपणारं दडपण येईल. यासाठी तयार राहण्यास मी खेळाडूंना सांगितलं आहे,’ असं रोहित शर्मा (Rohit Sharma) शेवटी म्हणाला. भारतीय संघ स्पर्धेच्या ६ दिवस आधी दुबईत आल्यामुळे फायदा झाल्याचं रोहितने सांगितलं.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.