- ऋजुता लुकतुके
यंदाची फिडे विश्वचषक ही मानाची स्पर्धा २९ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान भारतातच होणार आहे. भारतासाठी हा मोठा सन्मान आहे. फिडेच्या वेबसाईटवर तशी घोषणाही करण्यात आली. पण, त्यानंतर काही तासांत भारत हे नाव तिथून काढून टाकण्यात आलं आहे आणि विश्वचषकाचा देश लवकरच घोषित करण्यात येईल असं फिडेनं म्हटलं आहे. पण, भारतीय बुद्धिबळ संघटनेनं मात्र आयोजनाची तयारी सुरू केली आहे. जानेवारी महिन्यातच फिडेशी अंतिम बोलणं झाल्याचं भारतीय संघटनेतील सूत्रांचं म्हणणं आहे. (FIDE World Cup in India)
‘बुद्धिबळ क्षेत्रात भारत सध्या उगवता देश आहे. भारतीय तरुणांनी अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. त्यामुळे इथे बुद्धिबळाची लोकप्रियता वाढतेय हे फिडेला ठाऊक आहे. त्यामुळे यजमानपद आपल्यालाच मिळणार,’ असं फिडेच्या सूत्रांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे. बुद्धिबळातील ही मोठी स्पर्धा आहे आणि यापूर्वी २००२ मध्ये ती भारतात हैद्राबाद इथं झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच इतकी महत्त्वाची स्पर्धा भारतात होत आहे. (FIDE World Cup in India)
(हेही वाचा – Mumbai Fire: गोरेगावच्या फर्निचर मार्केटला भीषण आग ; 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल)
पुढील महिन्यापर्यंत स्पर्धेची अधिकृत घोषणा होईल असा भारतीय संघटनेचा अंदाज आहे. स्पर्धा कुठे भरवायची याचा फैसला मात्र अजून झालेला नाही. बुद्धिबळ संघटनेच्या बैठकीत यावर चर्चा अपेक्षित आहे. भारताने मागच्या वर्षभरात बुद्धिबळ क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकलं. त्यानंतर डी गुकेशने कँडिडेट्स चषक स्पर्धा जिंकून चिनी जगज्जेता डिंग लिरेनला आव्हान दिलं आणि या सर्वावर कडी म्हणजे गुकेशने डिंग लिरेनला जगज्जेतेपदाच्या लढतीत हरवलंही. (FIDE World Cup in India)
आणि या कामगिरीबरोबरच लिरेन १९ वर्ष आणि १६५ दिवस या वयात जगातील वयाने सगळ्यात लहान जगज्जेता ठरला आहे. तर अर्जुन एरिगसीने यंदा २८०० एलो रेटिंग गुणांचा महत्त्वपूर्ण टप्पाही पार केला. ही कामगिरी करणारा तो आनंद नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू आहे. (FIDE World Cup in India)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community