- ऋजुता लुकतुके
यंदाच्या आशियाई खेळांमध्ये भारतीय संघाने पदकांचं शतक गाठलं आहे. ७१ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय संघ इथवर पोहोचला आहे. होआंगझाओ आशियाई क्रीडास्पर्धा भारतीय संघासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत. कारण, पहिल्यांदाच भारतीय पथकाने पदकांचं शतक पूर्ण केलं आहे. शुक्रवारपर्यंत भारताने ९५ पदकं जिंकलेली आहेत. आणि सात पदकं निश्चित आहेत. म्हणजेच शतक नक्की आहे.
जी सात पदकं निश्चित आहेत ती आहेत कम्पाऊंड तिरंदाजी (३), पुरुषांचं क्रिकेट (१), कबड्डी (२) आणि बॅडमिंटन (१). शिवाय यंदाच्या स्पर्धेत पहिल्यांदाच भारतीय पथकाने सुवर्ण पदकांची संख्याही २०च्या पार नेली आहे. आणि सगळं मनासारखं घडलं तर ही संख्याही पाव शतकाच्या पुढे जाऊ शकते. आतापर्यंत भारताकडे २२ सुवर्ण पदकं आहेत. नेमबाजी आणि ॲथलेटिक्समधील पदकांमुळे भारताने ही कामगिरी केली आहे.
इतकंच नाही तर यंदा पहिल्यांदा आशियाई स्तरावर टी-२० क्रिकेटचा समावेश करण्यात आला. आणि इथंही महिलांच्या संघाने सुवर्ण जिंकलं आहे. तर शनिवारी पुरुषांनाही ते जिंकण्याची संधी आहे. पुरुषांच्या संघाची अंतिम लढत अफगाणिस्तानशी होणार आहे.
(हेही वाचा – Maratha-Kunbi Certificate : मराठा-कुणबी प्रमाणपत्र समिती मराठवाड्याच्या दौऱ्यावर )
एरवी नेमबाजी हा भारतीयांसाठी पदक विजेता खेळ. पण, यंदा ॲथलेटिक्सने नेमबाजीलाही मागे टाकलं आहे, ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. ॲथलेटिक्समध्ये आतापर्यंत भारताला ६ सुवर्णांसह एकूण २९ पदकं मिळाली आहेत. त्या पाठोपाठ नेमबाजीत भारताने २३ पदकं मिळवली आहेत. यात ७ सुवर्ण पदकांचा समावेश आहे. याशिवाय काही खेळांमध्ये भारताने पहिल्यांदा किंवा अनेक वर्षांनंतर सुवर्ण जिंकलं. घोडेसवारी हा असाच एक खेळ. ड्रेसेज प्रकारात भारतीय संघाने पहिल्यांदा सुवर्ण जिंकलं. आणि घोडेसवारीतील भारताचं हे ४१ वर्षांनंतर मिळालेलं पदक होतं. याशिवाय रोईंग आणि सेलिंगमध्येही भारतीय संघाने पदकांची लूट केली आहे.
बॅडमिंटन हा खेळ युरोप आणि आशियात सगळ्यात लोकप्रिय आहे. आणि चीन, जपान, कोरिया, तैवान हे खेळातील बलाढ्य संघ आहेत. त्यामुळे या खेळातील आशियाई पदक हे अगदी ऑलिम्पिक किंवा विश्वविजेतेपदापेक्षा कमी नाही. इथंही महिलांच्या संघाने थोडीफार निराशा केली असली तरी पुरुषांनी सांघिक प्रकारात रौप्य जिंकलं. अंतिम लढतीत चीनला त्यांनी काटे की टक्कर दिली. आणि एच एस प्रणॉयने दुखापतीशी झुंजत एकेरीत कांस्य जिंकलं. पुरुषांच्या दुहेरीत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी अंतिम फेरीत पोहोचली आहे. स्पर्धेचा अजून एक दिवस बाकी आहे. आणि ८ ऑक्टोबरला समारोपाचा सोहळा रंगेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community