यंदाचे वर्ष हे भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या कालावधीत भारताचा सर्वांगीण विकास झाला. तसेच या कालखंडात महिलांची प्रगती झाली, त्यांचे सक्षमीकरण झाले. म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने देशवासियांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत व्हावे. या उद्देशाने कर्नाटकातील पंचकन्यांनी शिखर ते सागर, असा साहसी प्रवास सुरु केला आहे. महाराष्ट्रात आल्यावर या धाडसी मुलींनी आवर्जून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि स्मारकाच्या कार्यकारिणी सदस्या आणि इंडियन मॉन्टेनरिंग असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा के. सरस्वती यांनी त्यांचा गौरव केला.
एकूण ३,३०० किमीपर्यंतचा साहसी प्रवास!
कर्नाटक राज्यातील क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या ऐश्वर्या, आशा, धनलक्ष्मी, पुष्पा आणि बिंदू या पाच युवतींच्या चमूने या साहसी प्रवासात सहभाग घेतला आहे. १७ मे रोजी या युवतींचा प्रवास लडाख येथील ‘खारदुंग ला’ या सर्वात उंच पर्वतावरून सुरु झाला. अत्यंत धाडसीवृत्तीने या युवतींनी हा पर्वत उतरून पुढील प्रवास सायकलने सुरु केला. हा प्रवास दिल्ली-आग्रा-राजस्थान-पंजाब-गुजरात-महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक असा सुरु आहे. त्यातील गोवा ते कर्नाटक हा प्रवास या युवती समुद्रीमार्गे करणार आहेत. हा संपूर्ण प्रवास ३ हजार ३०० किमी अंतराचा आहे. त्यातील २ हजार ७०० किमी प्रवास पूर्ण झाला असून ६०० किमी अंतराचा प्रवास बाकी आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन!
या युवतींचा चमू महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी शनिवारी, ९ ऑक्टोबर रोजी आवर्जून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकला भेट दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्रोत होते, तसेच हजारो क्रांतिकारकांच्या स्फूर्तीस्थानी होते. म्हणूनच वीर सावरकर यांचे दर्शन घेणे या साहसी युवतींसाठी विलक्षण अनुभव होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट देऊन आमच्यातील राष्ट्रभावना अधिक जागृत झाल्या. या साहसी प्रवासादरम्यान विविध राज्यांत आलेला अनुभव आम्ही हा प्रवास संपल्यावर संकलित करणार आहोत, असे या युवतींच्या चमूतील बिंदू यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ ला प्रतिक्रिया देताना सांगितले.
Join Our WhatsApp Community