चहलला संघातून आऊट केल्याने सेहवागची बीसीसीआयवर फटकेबाजी

चहल पूर्वी देखील चांगली गोलंदाजी करत होता, टी-20 विश्वचषक संघातून त्याला का वगळण्यात आले, हे मला समजलेले नाही.

आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळणा-या युझवेंद्र चहलने नुकत्याच झालेल्या सामन्यात आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी केली. रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात युझवेंद्र चहलने केलेल्या शानदार कामगिरीनंतर, भारताचा माजी धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आगामी टी-20 विश्वचषकासाठी चहलची निवड न केल्याने निवडकर्त्यांना प्रश्न केला आहे.

काय म्हणाला सेहवाग

चहलने मुंबई विरुद्धच्या सामन्यात चार ओव्हरमध्ये 11 धावा देत तीन महत्त्वाच्या विकेट्स पटकावल्या. त्यामुळे आरसीबीचा विजय निश्चित झाला. चहलला स्ट्रीट-स्मार्ट बॉलर म्हणत सेहवागने विश्वचषक संघातून त्याला वगळण्यासाठी निवडकर्त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे क्रिकबझ लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. सेहवाग पुढे म्हणाला की, चहल हा टी-20 संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. चहल पूर्वी देखील चांगली गोलंदाजी करत होता, टी-20 विश्वचषक संघातून त्याला का वगळण्यात आले, हे मला समजलेले नाही.

(हेही वाचाः टी-20 वर्ल्ड कपः भारतीय संघाची घोषणा! वाचा कोणाला मिळाले संघात स्थान)

टी-20 विश्वचषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या 18 सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह एकूण पाच फिरकी गोलंदांजांना संधी देण्यात आली आहे. तर संघात चहलऐवजी फिरकी गोलंदाज म्हणून राहुल चहर प्राधान्य देण्यात आलं आहे.

म्हणून करण्यात आली चहरची निवड

अनुभवी चहलच्या जागी राहुलवर विश्वास का ठेवण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी दिले आहे. आम्हाला वेगानं बॉल टाकू शकेल अशा लेग स्पिनरची गरज होती. आम्ही नुकतंच चहरला चांगल्या गतीने बॉल टाकताना पाहिलं होतं. ते पाहून याच स्पिनरची आपल्याला गरज आहे, असं निवड समितीला वाटलं. चहल आणि चहर यांच्या नावावर बराच विचार करण्यात आला. अखेर सर्वसंमतीने राहुल चहरची निवड करण्यात आली, असे शर्मा यांनी सांगितले.

(हेही वाचाः टी-20 विश्वचषकाचे अँथम साँग रिलीज! कधी होणार भारत-पाक सामना?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here