- ऋजुता लुकतुके
आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या संघ निवडीच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. आणि कर्णधार रोहित शर्माने अलीकडेच भारताला क्रमांक चारवर खेळणारा फलंदाज अजून मिळालेला नाही, असं भाष्य केलं होतं. त्यावर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आता आपला अनुभव सांगितला आहे. अलीकडेच भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माने एका खाजगी कार्यक्रमात बोलताना भारतीय संघात नियमित चौथ्या क्रमांकाचा खेळाडू नाही. आणि संघाला हीच उणीव जाणवते आहे, असं भाष्य केलं होतं. त्यावर माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी २०१९ मध्ये या क्रमांकासाठी आपण विराट कोहलीचं नाव सुचवलं होतं, असं म्हटलंय.
स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील संघ निवडीशी निगडित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. तेव्हाचे निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद यांच्याशीही आपण या विषयावर बोललो होतो, असं शास्त्री यांनी म्हटलं आहे. विराट कोहली २०११ मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर खेळला. पण, त्यानंतर तो तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे. पण, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याची सरासरी ५५.२१ धावांची आहे. ३९ सामन्यांमध्ये विराटने १७६७ धावा करताना ७ शतकं आणि ८ अर्धशतकं ठोकली आहेत.
‘२०१९च्या युकेमध्ये झालेल्या विश्वचषकात विराटने चौथ्या क्रमांकावर खेळावं असं मला वाटत होतं. आणि संघ हितासाठी तो खेळलाही असता. तो चौथ्या क्रमांकावर खेळला तर फलंदाजीत समतोल साधला जातो. मी तेव्हा निवड समितीशीही याविषयी बोललो होतो,’ असं रवी शास्त्री म्हणाले. विंडिज दौऱ्यात भारतीय संघाने अनेक नवोदितांना संधी दिली. पण, एकदिवसीय आणि टी-२० स्पर्धेतही भारतीय संघाचं शेपूट लवकर गुंडाळत असल्याचं अधोरेखित झालं. म्हणजे तळाचे फलंदाज धावसंख्येत फारशी भर न घालताच बाद होत आहेत. अशावेळी विराट कोहलीचा फलंदाजीतील क्रमांक आणि फलंदाजांची मधली फळी, यावर येत्या दिवसांमध्ये अधिकाधिक चर्चा रंगणार हे नक्की.
(हेही वाचा – MNS Activists : मुंबई गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांची तोडफोड)
अशावेळी क्रिकेटमधील एक जाणकार आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं मत नक्कीच महत्त्वाचं आहे. के एल राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया चषकात खेळू शकतील की नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. नाहीतर श्रेयस अय्यर या आणखी एका फलंदाजाने चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी केली आहे. ३४ सामन्यांत त्याने १३०० च्या वर धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर कोण खेळेल हा सध्या भारतीय संघासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचवेळी रवी शास्त्री यांनी युवा फलंदाज तिलक वर्माचं कौतुक केलं आहे. टी-२० स्पर्धेत सर्वात यशस्वी भारतीय फलंदाज ठरलेला तिलक शास्त्री यांना भविष्यात संघासाठी महत्त्वाचा वाटतो. ‘पहिल्या सात फलंदाजांमध्ये तीन डावखुरे असेल तर संघासाठी ते खूप फायद्याचं असतं. आणि तिलक वर्माने विंडिजमध्ये फलंदाजीतील आपला खमका स्वभाव दाखवला आहे. त्याने सातत्य टिकवलं तर त्याला चांगली संधी असेल,’ असं शास्त्री यांना वाटतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community