ऋजुता लुकतुके
२०२१ च्या वर्ल्ड टी-२० स्पर्धेत भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने टी-२० संघाची कप्तानी सोडली. आणि काही महिन्यांतच त्याने एकदिवसीय आणि कसोटी संघाचं नेतृत्वही त्याने सोडलं. (Ganguly on Virat) पण, कप्तानी सोडल्यानंतर विराटचं एक वक्तव्य तेव्हा गाजलं होतं. आणि भारतीय क्रिकेटमधला एक वाद त्यातून उफाळून आला होता.
‘एकदिवसीय आणि कसोटी संघांचं कर्णधारपद मला खरंतर सोडायचं नव्हतं. आणि टी-२० कप्तानी सोडल्यावर मी ती सोडू नये यासाठी कुणीही माझ्याशी बोललं नव्हतं,’ असं खळबळजनक विधान विराटने तेव्हा केलं होतं. त्यामुळे मग त्याला कप्तानी सोडण्यासाठी बीसीसीआयकडून सांगण्यात आलं की काय अशा जोरदार चर्चा रंगल्या.
बीसीसीआयचे तेव्हाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडेच सगळ्यांची बोटं होती. पण गांगुलीने (Ganguly on Virat) तेव्हाही हे आरोप फेटाळले होते. ‘विराटला कप्तानी सोडण्यासाठी मी सांगितलं नव्हतं. उलट निवड समितीला वेगवेगळ्या प्रकारांसाठी वेगवेगळे कर्णधार नको होते, त्यामुळे मी विराटला टी-२० कप्तानीही न सोडण्याची विनंती केली होती,’ असं गांगुली म्हणाले होते.
(हेही वाचा-Cyclone Michaung: ‘मिचॉंग’मुळे रेल्वे, विमान वाहतूक विस्कळीत, १००हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द)
आताही दादागिरी अनलिमिटेड या रियालिटी शोमध्ये बोलताना सौरव गांगुली (Ganguly on Virat) यांनी आपली तेव्हाची भूमिका मांडली आहे. ‘मी विराटला कप्तानी सोडायला सांगितलं नव्हतं. पण, त्याला टी-२० ची कप्तानी नको होती. आणि निवड समितीचं असं मत होतं की, तीन प्रकारांत दोन वेगवेगळे कर्णधार नकोत. त्यामुळे मी विराटला कप्तानी सोडणार असशील तर तीनही प्रकारात सोड इतकंच सांगितलं,’ असं गांगुली म्हणाले आहेत.
इतकंच नाही तर रोहीत शर्माचं कप्तानीसाठी मन वळवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ‘रोहीत सुरुवातीला तीनही प्रकारात नेतृत्वासाठी तयार नव्हता. तो टी-२० साठी तयार होता. त्याला मी तीनही प्रकारात नेतृत्व करण्यासाठी तयार केलं,’ असं याविषयी गांगुली म्हणाले.
भारतीय क्रिकेटचं भलं करण्यासाठी माझी नियुक्ती झाली होती. तोच दृष्टिकोण ठेवून आपण तेव्हा वागल्याचं गांगुली यांनी स्पष्ट केलं. त्या अख्ख्या प्रकारानंतर विराट कोहली आणि सौरव गांगुली यांचे संबंध मात्र ताणले गेले होते.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community