- ऋजुता लुकतुके
बोर्डर-गावस्कर मालिकेतील पराभवाची गडद छाया अजूनही भारतीय संघावर कायम आहे. मालिका संपून खेळाडू भारतात परतल्यालाही आता पंधरा दिवस झाले. पण, त्याविषयी येणाऱ्या बातम्या नकारात्मकच आहेत. रविवारी ११ जानेवारीला झालेल्या आढावा बैठकीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने एका मुंबईकर खेळाडूवर ड्रेसिंग रुममध्ये घडणाऱ्या गोष्टी मीडियाकडे फोडल्याचा आरोप केला आहे. (Gautam Gambhir Furious)
या कसोटीनंतर एका पत्रकार परिषदेतही गंभीरने आपली भूमिका स्पष्ट करताना या गोष्टीचा उल्लेख केला होता. ‘ड्रेसिंग रुममध्ये प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यात जे बोलणं होतं, ते खाजगी असतं आणि ते तसंच राहिलं पाहिजे. खेळाडूंनीच आतल्या घडामोडी मीडियाला सांगता कामा नयेत,’ असं गंभीर तेव्हा जाहीरपणे पत्रकार परिषदेत म्हणाला होता. तेव्हाचा त्याचा रोख मुंबईकर खेळाडू सर्फराझ खानवर होता, असं आता समजतंय. (Gautam Gambhir Furious)
(हेही वाचा – Election Commission कडून राजकीय पक्षांसाठी ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’बाबत मार्गदर्शक सूचना जारी)
एका बातमीनुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बीसीसीआयच्या आढावा बैठकीत बोलताना ड्रेसिंग रुममधील संभाषण सर्फराझनेच बाहेर फोडल्याचा आरोप केला आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अलीकडेच गौतम गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत निषेधांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. रोहित, विराटच्या कामगिरीवरही चर्चा झाली. तर गंभीरने मांडलेला मुद्दा सर्फराझ खानचाही होता. (Gautam Gambhir Furious)
मेलबर्न कसोटीत शेवटच्या दिवशी भारतीय संघाचा पराभव झाला. फलंदाजीला पोषक वातावरणात भारतीय खेळाडू शेवटच्या सत्रात बाद झाले. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये चिडलेल्या गंभीरने खेळाडूंची हजेरी घेतली. त्यानंतर भारतीय संघातील फलंदाजीच्या क्रमावरही बराच खल ड्रेसिंग रुममध्ये सुरू होता. रोहितने सिडनी कसोटीतून माघार घेतल्यावर त्याच्याजागी कर्णधार कोण होणार ही चर्चाही बाहेर माध्यमांपर्यंत पोहोचत होती. भारतीय संघातील एक खेळाडू जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्याच्या बाजूने नव्हता. कारण त्याला कर्णधार व्हायचे होते. पण, या खेळाडूचे नाव उघड करण्यात आले नाही. ही बातमीही मीडियापर्यंत पोहोचली आणि त्यामागे संघातीलच खेळाडू होता, असं गंभीरचं म्हणणं आहे. अर्थात, त्याने त्यासाठी कुठलेही पुरावे दिलेले नाहीत. (Gautam Gambhir Furious)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community