Gautam Gambhir : गौतम गंभीर भारतीय अ संघाबरोबर इंग्लंडला जाणार?

Gautam Gambhir : भारतीय संघाच्या दौऱ्यापूर्वी अ संघाचा इंग्लंड दौरा होणार आहे.

36
Gautam Gambhir : गौतम गंभीर भारतीय अ संघाबरोबर इंग्लंडला जाणार?
  • ऋजुता लुकतुके

भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन पायंडा पाडण्याच्या तयारीत आहे. येत्या जूनमध्ये भारतीय संघ इंग्लंडचा बहुप्रतिक्षित कसोटी दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारताला ५ कसोटी सामने खेळायचे आहेत. आणि या दौऱ्यापूर्वी भारतीय अ संघही इंग्लंडचा दौरा करणार आहे आणि अ संघाच्या दौऱ्यावर जाण्याची तयारी गौतम गंभीरने (Gautam Gambhir) चालवली आहे. त्यासाठी त्याने बीसीसीआयकडे परवानगी मागितल्याचं कळतंय. अ संघ हा राष्ट्रीय संधाचा एक प्रकारे दुय्यम संघ मानला जातो. किंवा राष्ट्रीय संघापर्यंत पोहोचण्याची ती एक महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे या संघात खेळणाऱ्या राखीव खेळाडूंची तयारी तपासून बघण्यासाठी गंभीरने ही विनंती केल्याचं समजतंय.

अर्थात, गौतम गंभीर (Gautam Gambhir) तिथे नेमक्या कुठल्या भूमिकेत जाणार हे अजून स्पष्ट नाही. कारण, भारतीय अ संघाबरोबर इतकी वर्षं क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष जात आले आहेत. त्यामुळे सध्या ही जबाबदारी व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्यावर आहे. तेव्हा आताही लक्ष्मणच संघाचे प्रशिक्षक म्हणून जातात आणि गंभीर फक्त निरीक्षक म्हणून जातात की, गंभीर (Gautam Gambhir)  प्रशिक्षक म्हणून या संधाबरोबर जातात हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

(हेही वाचा – “पुढची मुंबई पालघरमध्ये…” ; CM Devendra Fadnavis यांचं विधान)

भारतीय अ संघाला नियमित असा प्रशिक्षक नेमलेला नसतो. आधी राहुल द्रविड यांची २०२१ पर्यंत त्या पदी नियुक्ती झाली होती. पण, द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्यावर बीसीसीआयने अ संघाबरोबर क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष (सध्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मण) किंवा क्रिकेट अकादमीतील इतर प्रशिक्षकांना पाठवायला सुरुवात केली. गौतम गंभीरने (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेटची धुरा हाती घेऊन आता ९ महिने झाले आहेत आणि त्याच्यावर २०२७ पर्यंत ही जबाबदारी राहणार आहे. या कालावधीत टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकाबरोबरच २०२६ च्या आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची तयारीही त्याला करायची आहे. त्यामुळे या तीनही प्रकारात आयसीसी स्पर्धा जिंकू शकतील असे संघ उभारणे ही गंभीरची (Gautam Gambhir) जबाबदारी आहे आणि त्यादृष्टीने भारताची राखीव खेळाडूंची फळी तपासण्यासाठी गंभीरने हा निर्णय घेतला असावा.

गंभीरच्या (Gautam Gambhir) नेतृत्वाखाली भारताने आपले सर्व टी-२० सामने जिंकले आहेत. तर अलीकडेच चॅम्पियन्स करंडक जिंकून एकदिवसीय प्रकारातील तयारीही भारताने दाखवून दिली आहे. पण, कसोटीत मात्र गंभीरच्या अधिपत्याखाली भारताला १० पैकी एकूण ६ कसोटी गमवाव्या लागल्या आहेत. तर एक अनिर्णित राहिली आहे. ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, गौतम गंभीर आणि क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्यात पुढील रणनीतीवर एकदा बैठक झाली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.