ऋजुता लुकतुके
आयपीएलमधील गुजरात टायटन्स या नवीन फ्रँचाईजीकडून दोन हंगाम खेळल्यानंतर अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या त्याचा मूळ आयपीएल संघ मुंबई इंडियन्सकडे परतला आहे. त्यासाठी मुंबईने गुजरातबरोबर खेळाडूंच्या लिलावाआधीच एक ‘डील’ केलं आहे. पण, या व्यवहारामुळे काही जणांच्या भुवया उंचावल्या आहेत.
कारण, रविवारी सर्व संघांनी ते संघात कायम ठेवत असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची होती. त्यावेळी गुजरात टायटन्स संघाच्या यादीत हार्दिकचं नाव होतं. आणि दुसऱ्याच दिवशी गुजरातने हार्दिकला मुंबईला विकल्याची बातमी आली. लिलावापूर्वी दोन संघांनी आपापसात असे व्यवहार करण्याची मुभा असते आणि त्यात मुंबईने हार्दिकला विकत घेतलं तर कॅमेरुन ग्रीनला बंगळुरु संघाला विकलं.
पण, या व्यवहारांवर कोलकाता नाईटरायडर्स संघाचे माजी क्रिकेट संचालक जॉय भट्टाचार्य यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भट्टाचार्य यांनी या घटनेचे संबंध २०१० सालच्या रवींद्र जाडेजाच्या फसलेल्या व्यवहाराशी जोडले आहेत.
(हेही वाचा-India To Tour Sri Lanka : भारतीय संघ पुढील वर्षी श्रीलंकेत खेळणार ६ एकदिवसीय व टी-२० सामने )
तेव्हा रवींद्र जाडेजा राजस्थान रॉयल्स संघाशी करारबद्ध होता. पण, त्याला मुंबई इंडियन्सकडे यायचं होतं. त्याने मुंबई फ्रँचाईजीशी आधीच बोलणी सुरू केली होती. त्याचा फटका त्याला बसला. हे अनैतिक असल्याचा ठपका त्याच्यावर ठेवून आयपीएल कार्यकारिणीने जाडेजावर एक वर्षाची बंदी घातली होती.
‘आयपीएलमध्ये आता जे झालं ते योग्य नाही. एखादा खेळाडू संघाकडून खेळायला नकार देतो आणि दुसरीकडेच सूत जुळवण्याचा प्रयत्न करतो, हे चुकीचं आहे. अशा वृत्तीला प्रोत्साहन मिळता कामा नये.२०१० मध्ये तुम्ही असा एक प्रकार रोखलात. आणि आता २०२३ मध्ये तसं उघडपणे घडू देत आहात. आयपीएलच्या व्यवस्थेला यातून धक्का लागत आहे,’ असं परखड मत भट्टाचार्य यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबई बरोबरचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर गुजरात टायटन्स संघाने हार्दिकनेच मुंबईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यावरून जॉय भट्टाचार्य यांनी हे मत व्यक्त केलं आहे. खेळाडू स्वत: मत उघड करून संघ बदलायला लागला तर आयपीएलच्या गाभ्यालाच त्यातून धक्का लागेल, असं भट्टाचार्य यांना वाटतं. खेळाडूंची निवड लिलावातून झाली पाहिजे. आणि त्यावेळी झालेल्या कराराचा आदर खेळाडूंनी केला पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे.
हेही पहा-