ऋजुता लुकतुके
हे ऑलिम्पिक पात्रता वर्ष आहे. आणि महिला हॉकी पात्रता स्पर्धा पुढील वर्षी रांचीत घेण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (Hockey Olympic Qualifier) जाहीर केला आहे. यापूर्वी ही स्पर्धा चीनच्या चांगझाओ शहरात होणार होती. पण, चीनने आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकून ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली आहे. त्यामुळे चीन या स्पर्धेत आता नसेल. त्यामुळे मग भारताला यजमानपद मिळालं आहे.
१३ जानेवारी ते १९ जानेवारी २०२४ दरम्यान या स्पर्धा आता रांचीच्या मरंग गोमके जयपाल सिंग स्टेडिअमवर भरवण्यात येईल. भारताबरोबर आणखी ७ संघ या स्पर्धेत सहभागी होतील. आणि स्पर्धेतील पहिल्या तीन संघांना ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळेल.
(हेही वाचा-Afghanistan’s Win Over Pakistan : अफगाणिस्तानच्या पाकिस्तानवरील विजयात ‘या’ भारतीयाचा आहे हातभार)
भारताबरोबरच मस्कत आणि व्हॅलेंसिया या शहरातही पात्रता स्पर्धा पार पडणार आहेत. आणि या स्पर्धांनंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे सगळे संघ ठरतील. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रांचीची यजमानपदासाठी निवड झाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.
‘रांचीमध्ये ऑक्टोबरच्या शेवटी महिलांची आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीही होणार आहे. या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमुळे रांची शहराचं नाव क्रीडा शहर म्हणून भारतात पुढे येईल. आणि याचा आम्हाला आनंद आहे,’ असं सोरेन यांनी बोलून दाखवलं आहे. तर भारतीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
‘ऑलिम्पिक पात्रता ही मोठी स्पर्धा आहे. आणि ती भारतात झाली तर हॉकीला (Hockey Olympic Qualifier) आणि भारतीय संघालाही त्याचा फायदाच होईल. महिला संघाला घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर चांगला खेळ करून दाखवण्याची संधी असेल,’ असं तिर्की म्हणाले आहेत.
भारतीय महिला संघाने होआंगझाओ आशियाई खेळांमध्ये जपानला हरवून कांस्य पदक जिंकलं होतं. फक्त सुवर्ण विजेत्याला ऑलिम्पिक पात्रता मिळणार असल्यामुळे ती संधी हुकली. तरी भारतीय महिला हॉकी संघाने स्पर्धेत चांगला खेळ केला होता. त्यामुळे ऑलिम्पिक पात्रतेसाठी भारतीय संघ उत्सुक आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community