- ऋजुता लुकतुके
मुख्य स्पर्धेपूर्वी विश्वचषक स्पर्धेचा करंडक सदस्य देशांमध्ये फिरवण्याची आयसीसीची एक परंपरा आहे. त्यानुसार, हा करंडक सध्या काही दिवस भारत दौऱ्यावर आहे. आणि सध्या तो चक्क ताजमहलच्या आवारात विराजमान आहे. उत्तरप्रदेशमध्ये आगऱ्यात असलेला ताजमहल ही युनेस्कोनं जागतिक वारसा हक्क प्रदान केलेली एक ऐतिहासिक वास्तू आहे. लाखो लोक दरवर्षी या वास्तूला भेट देण्यासाठी जगभरातून येतात. पण, सध्या ताजमहल आणि यमुना नदीच्या पात्राबरोबरच लोकांसाठी आणखी एक आकर्षणाचा बिंदू ठरतोय तो म्हणजे इथं विराजमान झालेला आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा करंडक.
लोक या करंडकासोबत फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतायत. आयसीसीने आपल्या अधिकृत पत्रकात ताजमहल परिसरात हा करंडक ठेवल्याची माहिती दिली आहे. ‘स्पर्धेला फक्त ५० दिवस बाकी आहेत. आणि स्पर्धेचा मानाचा करंडक सध्या भारतात ताजमहल सारख्या वास्तूच्या सानिध्यात आहे. सूर्यकिरणांमुळे चांदीचा हा करंडक आणखीच उजळून निघाला आहे. ५ ऑक्टोबरला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू होईल तेव्हा सगळ्यांनी एकमेव ईर्ष्या असेल ती करंडक उचलण्याची. सध्या ती संधी काही चाहत्यांना मिळते आहे,’ असं आयसीसीने पत्रकात म्हटलं आहे.
UP | ICC Men’s World Cup trophy displayed at Taj Mahal in Agra today pic.twitter.com/qRCuMKAznF
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 16, 2023
(हेही वाचा – BJP MLA : आता आमदार जाणून घेणार जनतेचा कौल; निवडणूकपूर्व सर्वेक्षणासाठी भाजपाकडून ३५० शिलेदार मैदानात)
भारतात हळू हळू सणासुदीचे दिवस सुरू होत आहेत. आणि त्याचवेळी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाही रंगणार आहे. त्यामुळे सण आणि खेळांचा सण समजला जाणारा विश्वचषक कार्यक्रम असा दुहेरी योग भारतीयांसाठी जुळून आला आहे, असंही आयसीसीने म्हटलं आहे.
सणाच्या दिवसांमुळे आयसीसीला स्पर्धेच्या वेळापत्रकात मात्र बदल करावे लागले आहेत. महत्त्वाचा भारत पाक सामनाही अहमदाबाद पोलिसांच्या विनंतीवरून एक दिवस आधी आणावा लागला आहे. आता हा सामना १५ ऑक्टोबर ऐवजी १४ ऑक्टोबरला होणार आहे. कारण, १४ ऑक्टोबरला नवरात्रीच्या बंदोबस्तामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण असणार आहे.
या सामन्याबरोबरच आणखी आठ सामन्यांचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. तिकीट विक्रीलाही त्यामुळे उशीर झाला आहे. पण, विश्वचषक करंडकाला लोकांचा प्रतिसाद मिळतोय हे ही खरं. ताजमहल परिसरात आलेल्या हजारो लोकांनी करंडकाबरोबर फोटो काढून घेतले. आणि तो पाहायला लोकांची झुंबड उडालेला पाहायला मिळतेय.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community