ऋजुता लुकतुके
क्रिकेट वर्तुळात आता पुढील वर्षी जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० (ICC T20 World Cup) विश्वचषक स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे. आयसीसीने गुरुवारी या स्पर्धेचा नवीन लोगो प्रसिद्ध केला. महिला आणि पुरुषांची स्पर्धा एकामागून एक अशी पार पडणार आहे. आणि हा लोगो सामायिक असेल.
‘टी-२० विश्वचषक हा त्यातील वेगवान ॲक्शन आणि गतिशील तसंच ऊर्जेनं भरलेल्या क्षणांसाठी प्रसिद्ध आहे. आणि याच गोष्टींना साजेसा असा नवीन लोगो आहे,’ असं आयसीसीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या लोगोमध्ये बॅट, चेंडू आणि वीजेचा प्रवाह अशा तीन गोष्टी ठळकपणे दिसतात.
Created from the three things that define T20I cricket – Bat, Ball, and Energy! 🤩
A striking new look for the ICC T20 World Cup 🏆 💥 ⚡️#T20WorldCup pic.twitter.com/YSRlBZ11C8
— T20 World Cup (@T20WorldCup) December 7, 2023
या लोगोमध्ये यजमान देश वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांची सांस्कृतिक पार्श्वभूमीही वापरली आहे. वेस्ट इंडिजमधील नारळाची झाडं तसंच अमेरिकेच्या ध्वजावरील पट्टे या लोगोत वापरण्यात आले आहेत. पुढील वर्षी जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये पुरुषांचा टी-२० विश्वचषक होणार आहे. यात २० संघांचे ५५ सामने होणार आहेत.
तर सप्टेंबर महिन्यात महिलांचा टी-२० विश्वचषक बांगलादेशमध्ये होत आहे. विश्वचषक स्पर्धेची वेबसाईट आता सुरू झाली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community