ऋजुता लुकतुके
भारत वि न्यूझीलंड ( IND vs NZ) उपान्त्य लढतीत भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. आणि दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
विश्वचषकाच्या उपान्य सामन्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिवसभरात ७०० च्या वर धावांची बरसात झाली. पण, शेवटी न्यूझीलंडला विजयासाठी ७० धावा कमीच पडल्या. आणि भारतीय संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. विराट कोहलीचं ५० वं एकदिवसीय शतक, त्याला शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरने दिलेली धुवाधार साथ, रोहीतने सुरुवातीला केलेली फटकेबाजी आणि महम्मद शामीचे सात बळी ही या सामन्याची वैशिष्ट्य ठरली.
नाणेफेक जिंकून रोहीत शर्माने भारतासाठी पहिली फलंदाजी घेतली. आणि वानखेडेचं तुलनेनं छोटं मैदान गाजवत भारताने ४ बाद ३९७ अशी टोलेदंग धावसंख्या उभा केली. आणि न्यूझीलंडला ३२७ धावांमध्ये बाद केलं.
𝗢𝗻𝗲 𝘀𝘁𝗲𝗽 𝗰𝗹𝗼𝘀𝗲𝗿! 🏆#TeamIndia 🇮🇳 march into the FINAL of #CWC23 🥳#MenInBlue | #INDvNZ pic.twitter.com/OV1Omv4JjI
— BCCI (@BCCI) November 15, 2023
शेवटच्या टप्प्यावर कुलदीप यादवने टाकलेली दोन अचूक षटकं आणि शामीने घेतलेले मोक्याचे बळी यामुळेही भारताला हा विजय साकारता आला. कारण, ३९८ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडनेही ३० षटकांत २ बाद २२० पर्यंत मजल मारली होती. आणि किवी कर्णधार केन विल्यमसन (६९) आणि शतकवीर डॅरिल मिचेल (१३४) मैदानावर होते, तोपर्यंत न्यूझीलंडनेही चांगली लढत दिली होती. पण, आवश्यक धावगती सुरुवातीपासून षटकामागे ८ धावांच्या आसपास होती. आणि ती राखण्यासाठी मोठे फटके मारणं आवश्यक होतं. ते मारतानाच न्यूझीलंडचे फलंदाज दडपणाखाली बाद होत गेले.
महम्मद शामीने ५४ धावा देताना ७ फलंदाज बाद केले. तोच भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याशिवाय कुलदीप यादवने ५५ धावांमध्ये १ बळी, जसप्रीत बुमराने ६४ धावांत १ बळी आणि महम्मद सिराजने ७८ धावांत १ बळी मिळवला. शामीचे आता या विश्वचषक स्पर्धेत १९ बळी झाले आहेत.
CWC2023 SF1. India Won by 70 Run(s) https://t.co/Yo2cO2Ll4W #INDvNZ #CWC23 #SemiFinal1
— BCCI (@BCCI) November 15, 2023
त्यापूर्वी भारतीय संघाने पहिली फलंदाजी करताना ३९७ धावांची मजल मारली ती विराट कोहलीच्या ११३ चेंडूंत ११७ धावा, श्रेयस अय्यरच्या ७० चेंडूंत १०५ धावा आणि शुभमन गिलच्या ६६ चेंडूंत नाबाद ८० धावा यांच्या जोरावर. विराटने सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतकांचा विक्रम मोडला. तर श्रेयस अय्यरने या विश्वचषकातील सलग दुसरं शतक झळकावताना ८ षटकारांची आतषबाजी केली. आणि संघाला ४०० धावांच्या जवळ नेलं. के एल राहुलनेही शेवटच्या षटकांत हाणामारी करत २९ चेंडूंत ३९ धावा केल्या.
स्पर्धेचा दुसरा उपान्त्य सामना गुरुवारी १६ नोव्हेंबरला कोलकाता इथं होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ इथं आमने सामने येतील. आणि या उपान्त्य सामन्यातील विजेत्या संघाची गाठ रविवारी १९ नोव्हेंबरला भारताबरोबर पडेल. हा अंतिम सामना अहमदाबादला होईल.
हेही पहा –