-
ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका श्रेयस अय्यरसाठी (Shreyas Iyer) फार बरी नव्हती. त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-२० मालिकेतूनही त्याला वगळण्यात आलंय. पण, या गोष्टी श्रेयस जास्त मनाला लावून घेत नाहीए. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी त्याला रणजी खेळण्याचा सल्ला दिलाय. आणि त्याप्रमाणे तो हा सामना खेळलाही. आणि त्याने संघासाठी कामगिरीही केली.
‘मी सध्या वास्तवात जगण्याचा प्रयत्न करतोय. अफगाणिस्तान विरुद्धची टी-२० मालिका खेळायला मिळाली नाही, याचं फार दु:ख मला करायचं नाही. किंवा इंग्लंड विरुद्घची मालिका आव्हानात्मक असेल म्हणून काळजीही करायची नाही. मी सध्या जे समोर आहे ते करतोय. आंध्रप्रदेश विरुद्ध मी खेळलो. त्यात चांगलं योगदानही दिलं. तेच महत्त्वाचं आहे,’ असं तो सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाला.
(हेही वाचा – Virat Kohli : मैदानात घुसलेल्या चाहत्याला सुरक्षारक्षकापासून जेव्हा कोहलीच वाचवतो…)
श्रेयस आखूड टप्प्याच्या चेंडूंवर बिचकतो, असं आफ्रिकेतील मालिकेत समोर आलं होतं. त्यानंतर आंध्रच्या गोलंदाजांनीही श्रेयसवर तोच प्रयोग करून पाहिला. पण, घरच्या मैदानावर श्रेयसने त्यांना चांगलं उत्तर दिलं. संघाची गरज ओळखून वेगवान धावा करताना त्याने ४८ चेंडूंत ४८ धावा केल्या.
रणजी सामन्यातील ताजा अनुभव श्रेयसला आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा वाटतो. ‘वर्षभर चाललेल्या दुखापतीनंतर मी मोठा कसोटी सामना खेळलो नव्हतो. आणि सलग दोन किंवा तीन दिवस क्षेत्ररक्षण करणं हे दुखापतीनंतर मला शक्य होत नव्हतं. पण, या सामन्यात आंध्रप्रदेशच्या दोन्ही डावांत मी पूर्णवेळ मैदानात होतो. आणि हे मला फलंदाजीपेक्षा जास्त मोलाचं वाटतं. इंग्लंड विरुद्ध मोठी कसोटी खेळण्याच्या दृष्टीने हा सराव महत्त्वाचा आहे,’ असं श्रेयसने आवर्जून सांगितलं.
इंग्लंड विरुद्घचा पहिला कसोटी सामना २५ जानेवारीपासून हैद्राबादला होणार आहे. आणि पहिल्या दोन कसोटींसाठी श्रेयसची संघात निवड झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community