Ind vs Aus, Brisbane Test : के. एल. राहुल चमकला; पण विराट, रोहित फ्लॉप का झाले?

Ind vs Aus, Brisbane Test : ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीवर खेळायचं तंत्र कुठलं?

51
Ind vs Aus, Brisbane Test : के. एल. राहुल चमकला; पण विराट, रोहित फ्लॉप का झाले?
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर-गावस्कर मालिकेसाठी संघ जाहीर झाला तेव्हा के. एल. राहुलच्या समावेशामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सततच्या दुखापती आणि कामगिरीतील सातत्याचा अभाव यामुळे त्याच्यावर टीका होत होती. पण, प्रत्यक्षात या मालिकेत राहुल हा एकटा फलंदाज तीनही कसोटींत सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसत आहे. आताही ब्रिस्बेन कसोटीत पहिल्या डावांत राहुल आणि जडेजा या दोनच भारतीय फलंदाजांना अर्धशतकी मजल मारता आली. महत्त्वाचं म्हणजे, रोहित आणि विराट हे अव्वल फलंदाज दुहेरी धावसंख्येच्या आत बाद होत असताना राहुल कसा टिकून राहिला, त्यासाठी त्याला कुठलं तंत्र उपयोगी पडलं, असा प्रश्न आता विचारला जात आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

भारताच्या आघाडीच्या फळीने केलेली हाराकिरी पाहिली तर यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे चारही फलंदाज उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू खेळताना बाद झाले. कधीतरी चेंडू बॅटला बसले नाहीत आणि जेव्हा बसले तेव्हा झेल उडाले. या अपयशात उठून दिसला आहे तो के. एल. राहुल. त्याच्या नावावर मालिकेत दोनच अर्धशतकं आहेत. पण, या खेळपट्टीवर खेळण्याचं तंत्र त्याला साध्य झालेलं दिसत आहे. (Ind vs Aus, Brisbane Test)

(हेही वाचा – Ind vs Aus, Brisbane Test : जाडेजा, बुमराह आणि आकाशदीप यांनी फॉलो – ऑन टाळला)

स्टार स्पोर्ट्सवरील विश्लेषणात्मक कार्यक्रमात राहुल आणि इतर फलंदाजांच्या तंत्रातील फरक अधोरेखित करण्यात आला आहे. त्यातून समोर आलेल्या गोष्टी बघूया,

  • विराट आणि रोहित चेंडू खेळताना त्यांची बॅट पॅडच्या खूप पुढे आलेली असते. म्हणजेच ते शरीरापासून दूर खेळत आहेत. तर राहुल आपली बॅट आणि पॅड यांच्या जवळ राहून खेळत आहे. त्यामुळे चेंडूचा टप्पा पडल्यानंतर त्याला खेळायला जास्त सेकंदं मिळतात. फलंदाजीचा हा पारंपरिक शास्त्रीय दृष्टिकोन आहे.
  • चेंडूचा टप्पा पडेपर्यंत राहुल आपली बॅट निर्णायकपणे हलवत नाही. तर रोहित आणि विराट यांनी फटके खेळण्याचा निर्णय घेतलेला असतो. म्हणजेच ते खूप लवकर बॅट फिरवण्याची घाई करत आहेत. तर राहुल संयमाने चेंडूला पारखून तो खेळताना दिसतो आहे. राहुलच्या तुलनेत कोहली जवळ जवळ ३ मीटर आधी चेंडूला खेळतो आहे. म्हणजेच चेंडूने आपली दिशा नीट ठरवण्यापूर्वीच विराटने आपला फटका खेळलेला असतो. (Ind vs Aus, Brisbane Test)

या मालिकेत विराट आणि रोहितसह इतर आघाडीच्या फळीतील फलंदाजांचं अपयश उठून दिसलं आहे. विराटने नाही म्हणायला पर्थमध्ये शतक साजरं केलं. पण, इतर डावांमध्ये त्याच्या धावा आहेत ५, ७, ११ आणि ३. तर रोहितही आतापर्यंतच्या ३ डावांमध्ये अपयशी ठरला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.