-
ऋजुता लुकतुके
ब्रिस्बेन कसोटीत (Brisbane Test) भारताची फलंदाजी ढेपाळली असताना संघाला अप्रत्यक्ष दिलासा मिळाला आहे तो ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाज जोश हेझलवूडच्या (Josh Hazlewood) दुखापतीचा. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना त्याच्या पोटरीला दुखापत झाली. चौथ्या दिवशी त्याने जेमतेम १ षटक टाकलं. आणि त्यानंतर तो मैदान सोडून गेला. तो मैदानावरही उशिरा आला. आणि पहिल्या षटकातच त्याच्या गोलंदाजीत अवघडलेपण जाणवत होतं. यष्टीपासून दूर आणि उंच टाकलेला पहिला चेंडू राहुलने आरामात सीमापार धाडला. आणि गोलंदाजीचा वेगही ताशी १३० किमींच्या वर जात नव्हता.
त्यानंतर चहापानाची विश्रांती घेण्यात आली. तेव्हा हेझलवूडने कर्णधार पॅट कमिन्स, स्टिव्ह स्मिथ आणि फिजीओ निक जोन्स यांच्याशी चर्चा करून मैदान सोडलं. हेझलवूडला तातडीने दुखापतीच्या निदानासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. ‘खेळाची सुरुवात होण्यापूर्वीच हेझलवूडने पोटरीला सूज आल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता रुग्णालयात स्कॅन केल्यावरच दुखापतीचं स्वरुप समजू शकेल,’ असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आलं आहे.
(हेही वाचा – D Gukesh : चेन्नईत परतल्यावर डी गुकेशने लुटली बंजी जंपिंगची मजा, व्हीडिओ व्हायरल)
दुखापतीमुळे हेझलवूड (Josh Hazlewood) ॲडलेड कसोटीत खेळू शकला नव्हता. तेव्हा त्याच्या कमरेचा स्नायू आखडला होता. त्यानंतर तो संघात परतला असला तरी आता पोटरीच्या दुखापतीमुळे तो मैदानाबाहेर आहे. हेझलवूडच्या (Josh Hazlewood) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियन संघाचं संतुलन मात्र बिघडलं आहे. कारण, ब्रिस्बेनमध्ये पावसाने खेळ वाया जात असताना कसोटी जिंकण्याचा एकमेव पर्याय म्हणजे भारतावर फॉलोऑन लादून पुन्हा फलंदाजी करायला लावणं. सामन्याचे दोन दिवस अजून बाकी आहेत.
पहिल्या डावांत रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आणि नितीश रेड्डी (Nitish Reddy) ही भारताची शेवटची फलंदाजांची जोडी मैदानात आहे. अशावेळी भारताला दोनदा बाद करायचं असेल तर मिचेल स्टार्कच्या आणि पॅट कमिन्सच्या बरोबरीने हेझलवूडवर मोठी जबाबदारी आहे. आणि तो नसेल तर नॅथन लिऑन, ट्रेव्हिस हेड यांना अतिरिक्त भार पडणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community