- ऋजुता लुकतुके
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटीत भारतीय संघ रोहित शर्माविना खेळणार असला तरी ही कसोटी सुरू असतानाच भारतीय कर्णधार संघात शामील होणार आहे. २३ नोव्हेंबरला रोहित मुंबईहून पर्थसाठी रवाना होणार आहे आणि २४ तारखेला तो संघाबरोबर असेल. १० आणि ११ नोव्हेंबरला भारतीय संघ दोन गटांमध्ये ऑस्ट्रेलियात पोहोचले तेव्हा त्यांच्याबरोबर रोहित नव्हता. आपल्या दुसऱ्या अपत्याच्या जन्मावेळी तो पत्नी रितिका सचदेवसोबत मुंबईत होता.
पण, आता तो पर्थला जायला शनिवारीच निघणार आहे. मधल्या काळात मुंबईतच वांद्रे येथील रिलायन्सचं क्रिकेट मैदान आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचं मैदान इथं तो सराव करत होता. पहिल्या कसोटीसाठी तो उपलब्ध होणार नसल्याचं त्याने बीसीसीआयला कळवलं होतं. (Ind vs Aus, Perth Test)
(हेही वाचा – Mission Olympic 2036 : भारताच्या ऑलिम्पिक आयोजन मोहिमेच्या केंद्रस्थानी आग्र्याचा ताजमहल?)
पण, आता पहिल्या कसोटीनंतर कॅनबेरा इथं होणाऱ्या सराव सामन्यासाठी उपलब्ध असल्याचं त्याने कळवलं आहे. दुसरी कसोटी ४ ते ८ डिसेंबर दरम्यान ॲडलेडला होणार आहे. दिवस-रात्र होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघ विशेष सराव करणार आहे. त्यामुळे रोहितनेही लगेचच ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.
पर्थमध्ये यशस्वी जयस्वालच्या साथीने के. एल. राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. तर शुभमन गिलही दुखापतग्रस्त असल्यामुळे देवदत्त पड्डिकलला संधी मिळेल तर नितिश रेड्डीही संघात पदार्पण करेल अशी दाट शक्यता आहे. कसोटी पूर्वीच्या अधिकृत पत्रकार परिषदेत बुमराहने भारतीय संघाच्या सिद्धतेविषयी सविस्तर माहिती दिली. (Ind vs Aus, Perth Test)
(हेही वाचा – Gautam Adani : गौतम अदानींनी समुहावर अमेरिकेत झालेले लाचखोरीचे आरोप फेटाळले)
‘भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं हा मी माझा बहुमान समजतो. तेज गोलंदाजाला अभावानेच ही संधी मिळते. माझी स्वत:ची अशी वेगळी शैली आहे. विराट आणि रोहित माझ्यापेक्षा वेगळे होते. आता संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणं हे माझं ध्येय आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघाचं पारडं जड असल्यासारखं भासत असेल. पण, आमची तयारीही झाली आहे आणि मैदानावर चांगली कामगिरी आम्ही करून दाखवू,’ असं बुमराहने बोलून दाखवलं.
पर्थमध्ये अलीकडे अनियमित पाऊस झाला आहे. पण, शुक्रवारी पावसाची शक्यता फक्त २० टक्के आहे. पण, ढगाळ वातावरणामुळे खेळपट्टीवर तेज गोलंदाजांना उसळी मिळेल असा अंदाज आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी सहा वाजता सामना सुरू होईल. (Ind vs Aus, Perth Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community