ऋजुता लुकतुके
स्पर्धा अंतिम सामन्यापर्यंत (Ind vs Aus, World Cup Final) पोहोचते तेव्हा आधीचे निकाल विसरून जायचे असतात. इथे फक्त उरते ती दोन संघांमधील स्पर्धा आणि खेळाडूंची मानसिक आणि शारीरिक क्षमता. अंतिम सामन्यासाठीचं रसायन वेगळं असतं. आणि हे या दोन्ही संघांना वेगळं सांगायला नको. कारण, त्यांच्यासाठी हा पहिलाच अनुभव नाही. हा. अनेक खेळाडू असे आहेत जे पहिल्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी खेळतायत.
दोन संघांबद्दल बोलायचं झालं तर स्पर्धेतले हो दोन सर्वोत्तम संघ आहेत याबद्दल कुणाच्या मनात शंका नसावी. भारतीय संघ निर्विवाद वर्चस्व गाजवून इथंपर्यंत पोहोचलाय. त्यांनी पहिली फलंदाजी केली तर सरासरी १७५ धावांनी त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना हरवलंय. आणि दुसरी फलंदाजी केली तर सरासरी ६४ चेंडू राखून त्यांनी कामगिरी फत्ते केलीय. हे त्यांनी सातत्याने १० सामन्यांत करून दाखवलंय. असा फॉर्म ही दुर्मिळ गोष्ट आहे. आणि हे खास आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची मोहीम आधी भारत आणि मग दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने सुरू झाली. पण, नंतर त्यांनी स्वत:ला सावरलंय. आणि पुढचा प्रत्येक सामना जिंकलाय. हा. यातले काही विजय त्यांच्यासाठी खूपच कठीण होते. पण, संघातील एकमेव तज्ज फिरकी गोलंदाज ॲडम झंपा आणि संघाची मजबूत फलंदाजी यांनी हे विजय शक्य करून दाखवले. पहिले खेळाडू गरज पडल्यास हाणामारी किंवा धीरोदात्त अशी दोन्ही प्रकारची फलंदाजी करु शकतात, ही त्यांची जमेची बाजू आहे.
उलट संघाला काही सामन्यांमध्ये करावा लागलेला संघर्ष संघाच्या पथ्यावरच पडल्याचं मिचेल मार्श मानतो. ‘संघ सर्वोच्च पातळीवर खेळ करतो, तेव्हा तो जिंकू शकतो. आणि आमचा संघ अगदी योग्य वेळी अशा क्षमतेला पोहोचला आहे,’ असं त्याने उपान्त्य सामन्यानंतर बोलून दाखवलं.
हे थोडसं खरं आहे. कारण, अफगाणिस्तान विरुद्ध गरज होती तेव्हा ग्लेन मॅक्सवेल २०१ धावा करून टॉप फॉर्ममध्ये आला. तर न्यूझीलंड विरुद्ध गरज असताना मायकेल स्टार्कला लय सापडली. पण, आता मूळातच पूर्ण क्षमतेनं खेळ करत असलेल्या भारतीय संघाबरोबर त्यांना खेळायचंय. आणि इथं रोहीत, शुभमन, विराट, श्रेयस आणि राहुल या फलंदाजांचा सामना स्टार्क, हेझलवूड, झंपा कसा करतात. किंवा बुमरा, शामी, सिराज, कुलदीप यांचा मुकाबला ट्रेव्हिस हेड, मार्श, स्टिव्ह स्मिथ इंग्लिस आणि ग्लेन मॅक्सवेल कसा करतात हे पाहण्यासारखं असणार आहे. कारण, ऑस्ट्रेलियन फलंदाज फिरकीसमोर चाचपडतात असं या स्पर्धेत दिसून आलं आहे. आणि अहमदाबादमध्ये तिथेही त्यांना पूर्ण क्षमतेनं खेळावं लागणार आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community