Ind vs Aus, World Cup Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात क्रिकेट, सूर्यकिरण एअरोबॅटिक शो आणि बरंच काही, बीसीसीआयचा भरगच्च कार्यक्रम

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात क्रिकेट सामन्याबरोबरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बीसीसीआयने भरगच्च कार्यक्रम आखला आहे

150
Ind vs Aus, World Cup Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात क्रिकेट, सूर्यकिरण एअरोबॅटिक शो आणि बरंच काही, बीसीसीआयचा भरगच्च कार्यक्रम
Ind vs Aus, World Cup Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात क्रिकेट, सूर्यकिरण एअरोबॅटिक शो आणि बरंच काही, बीसीसीआयचा भरगच्च कार्यक्रम

ऋजुता लुकतुके

विश्वचषकाचा अंतिम सामना (Ind vs Aus, World Cup Final) पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गर्दी करणाऱ्या १.३ लाख प्रेक्षकांना रविवारी (१९ नोव्हेंबर) क्रिकेट सामन्याबरोबरच सामन्याच्या सुरुवातीला आणि मध्यंतराला भरगच्च मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. काही कारणांमुळे बीसीसीआयने स्पर्धेचा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला होता. पण, आता ही कसर भरून काढण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न दिसतो आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (Ind vs Aus, World Cup Final) पंतप्रधान, यापूर्वी भारताला दोन वेळा विश्वचषक मिळवून देणारे कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव आणि यांच्या खेरिज बॉलिवूड आणि इतर मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज कलाकार असे सगळे रविवारी भारत – ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीचा सामना पाहायला नरेंद्र मोदी स्टेडिअमवर येणार आहेत.

सव्वा लाख प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असेल सूर्यकिरण या भारतीय वायूदलाच्या एअरोबॅटिक पथकाचा चित्तथरारक एअरशो, लेझर शो आणि सांगीतिक कार्यक्रमही. बीसीसीआयने सामन्यासाठी येणाऱ्या सेलिब्रिटींची यादी तसंच अंतिम सामन्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

दुपारी दीड वाजता नाणेफेक पार पडल्यावर सूर्यकिरणचा एअरशो होईल. तर ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान कोक स्टुडिओचा गुजराती गायक आदित्य गढवी आपला कार्यक्रम सादर करेल. तर दोन डावांच्या मध्ये असलेल्या मध्यंतराला बॉलिवूडमधील संगीतकार प्रीतम आणि जोनिता गांधी, तुषार जोशी, नकाश अझीझ आणि अमित मिश्रा आपला हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमासाठी मुंबईहून पाचशे नर्तिका अहमदाबादला पोहोचल्या आहेत.

१९७५ पासून आतापर्यंतच्या विश्वचषक विजेत्या संघाच्या कर्णधारांना विशेष ब्लेझर देऊन त्यांचा सन्मानही यावेळी करण्यात येणार आहे. या खास कार्यक्रमासाठी १९७५ आणि १९७९ विश्वचषक विजेत्या वेस्ट इंडिज संघाचे कर्णधार क्लाईव्ह लॉईड, १९८३ च्या विश्वचषकविजेत्या भारतीय संघाचा कर्णधार कपिल देव, १९८७ च्या विजेत्या संघाचा कर्णधार ॲलन बोर्डर, ऑस्ट्रेलियाचे स्टिव्ह वॉ आणि मायकेल स्लेटर, भारताचा महेंद्रसिंग धोनी, ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क तर इंग्लिश माजी कर्णधार इयॉन मॉर्गन यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.