Ind vs Aus World Cup Final : भारतीय संघाचा १० सामन्यांचा अपराजित प्रवास

भारतीय संघासाठी या विश्वचषकातील मोहीम आतापर्यंत भन्नाट यशदायी ठरली आहे. भारतीय संघाने तब्बल ७ वेळा प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद केलं. पण, भारतीय संघाला अजून तरी एकही संघ सर्वबाद करू शकलेला नाही.

153
Ind vs Aus World Cup Final : भारतीय संघाचा १० सामन्यांचा अपराजित प्रवास
Ind vs Aus World Cup Final : भारतीय संघाचा १० सामन्यांचा अपराजित प्रवास
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघासाठी या विश्वचषकातील मोहीम आतापर्यंत भन्नाट यशदायी ठरली आहे. भारतीय संघाने तब्बल ७ वेळा प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद केलं. पण, भारतीय संघाला अजून तरी एकही संघ सर्वबाद करू शकलेला नाही.

ही विश्वचषक स्पर्धा कमालीच्या उकाड्यात सुरू झाली आणि सुरुवातीला स्पर्धेविषयी फारसं वातावरणही नव्हतं. इतकं की, लोकांनी हाकाटी सुरू केली एकदिवसीय क्रिकेट संपलं! एकदिवसीय क्रिकेटचं भवितव्य काय असेल माहीत नाही. पण, हळू हळू भारताचे सामने सुरू झाले, भारत जिंकत गेला आणि पुढे स्पर्धेची उत्सुकताही वाढत गेली. (Ind vs Aus World Cup Final)

भारतीय संघाने तर प्रत्येक सामन्यात आपली कामगिरी उंचवत नेली. ओळीने पहिले पाच सामने दुसरी फलंदाजी करत जिंकले. एकदा २७५ धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि पहिली फलंदाजी करताना चारदा तीनशेच्या वर धावसंख्या रचली. कधी रोहीत शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली तर कधी श्रेयस अय्यर आणि के एल राहुल, एकदा गरज पडली तेव्हा रवी जाडेजाही..गरज पडेल तसे फलंदाज धावांची जबाबदारी आपल्या शिरावर घेत होते.

आणि गोलंदाजांनी तर या स्पर्धेतील सर्वात भेदक तोफखाना असं बिरूद मिळवलं आहे. या घडीला विराट कोहली हा स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी फलंदाज आहे तर मोहम्मद शामी सगळ्यात यशस्वी गोलंदाज. के एल राहुलही यष्टीरक्षण आणि झेलांच्या बाबतीत फार मागे नाही. (Ind vs Aus World Cup Final)

असा सर्वांगसुंदर खेळ करत भारतीय संघाने आतापर्यंत १० पैकी १० सामने जिंकले आहेत. या सामन्यांच्या गुणफलकावर एक नजर टाकूया… (Ind vs Aus World Cup Final)

८ ऑक्टोबर २०२३, चेन्नई (वि. ऑस्ट्रेलिया)

भारताचा हा पहिलाच सामना आणि सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूचं निदान झालं. मग ऐनवेळी संघात ईशान किशन आला. खेळपट्टी फिरकीला साथ देणार याचा अंदाज घेऊन संघ प्रशासनाने अश्विन, कुलदीप आणि जाडेजा असं फिरकी त्रिकुट खेळवलं.

त्याचा उपयोग झाला. तिघांनी आपल्या ३० षटकांत फक्त १०४ धावा दिल्या आणि ४ बळीही घेतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला १९९ धावांत रोखणं शक्य झालं. हे आटोक्यातील लक्ष्य पार करताना आघाडीच्या फळीची मात्र दमछाक झाली आणि रोहित, ईशान आणि श्रेयस शून्यावर बाद झाले. पण, ३ बाद २ या धावसंख्येवरून के एल राहुल आणि विराट कोहलीने डाव सावरला आणि संघाला विजयही मिळवून दिला. विराटने ८५ तर राहुलने नाबाद ९७ धावा केल्या. भारताची सुरुवात विजयाने झाली. (Ind vs Aus World Cup Final)

(हेही वाचा – Ind vs Aus : भारतीय संघाच्या यशामागील पडद्या मागचे चेहरे)

११ ऑक्टोबर २०२३, नवी दिल्ली (वि. अफगाणिस्तान)

अफगाणिस्तानच्या दुसऱ्या सामन्यातही शुभमन गिल खेळणार नव्हताच. त्यामुळे ईशानची जागा पक्की होती. फक्त यावेळी अश्विनच्या जागी शार्दूल ठाकूर संघात आला. अफगाणिस्तानने कर्णधार हशमतुल्ला शाहिदीच्या ८० आणि ओमारझाईच्या ६२ धावांच्या जोरावर २७३ धावांचं आव्हान समोर ठेवलं. बुमराने या सामन्यात ४ गडी बाद केले.

पण, भारतीय कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीलाच घणाघाती शतक करून अफगाणिस्तानच्या गोलंदाजीची हवाच काढून घेतली. ८४ चेंडूंत त्याने १३१ धावा केल्या आणि विराटनेही अर्धशतक केलं. भारताने हा सामना ३५व्या षटकांतच आठ गडी राखून जिंकला. (Ind vs Aus World Cup Final)

१४ ऑक्टोबर २०२३, अहमदाबाद (वि. पाकिस्तान)

पुढील सामना होता पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध अहमदाबादेत. इतर पाकविरुद्धच्या सामन्याची होते तशी हवा या सामन्याचीही झाली होती. पण, प्रत्यक्ष मैदानात पाकचा संघ थिटा पडला. कर्णधार बाबर आझमने ५० आणि मोहम्मद रिझवानने ४९ धावा करून पाकला निदान १९० चा टप्पा ओलांडून दिला. शार्दूल ठाकूर वगळता भारताच्या इतर पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

आणि उत्तरादाखल, भारतीय संघाने १९२ धावा केल्या त्या ३१ व्या षटकांतच. पुन्हा एकदा रोहितने सलामीला ८६ धावा केल्या. आणि श्रेयस अय्यर ५१ धावांवर नाबाद राहिला. निर्विवाद वर्चस्व गाजवून भारताने हा सामना जिंकला. (Ind vs Aus World Cup Final)

१९ ऑक्टोबर २०२३, पुणे (वि. बांगलादेश)

पुण्यातील बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या घोट्याला ती दुखापत झाली आणि तोपर्यंत जमून आलेला संघ फुटला. हार्दिकचं ते षटक विराट कोहलीने पूर्ण केलं. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. आतापर्यंत धावांचा यशस्वी पाठलाग केलाय. मग, अचानक ती सवय का बदला, असा विचारही त्याने बोलून दाखवला.

बांगलादेशने पहिली फलंदाजी करताना ५० षटकांत २५६ धावा केल्या. तनझिद हसन आणि लिट्टन दास या सलामीवीरांनी अर्धशतकं केली. बुमरा, जडेजा आणि सिराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

या सामन्यात विराटने स्पर्धेतील पहिलं शतक झळकावलं. शुभमन गिलनेही डेंग्यूनंतर खेळताना अर्धशतक झळकावलं. तर रोहीतने ४८ धावा केल्या. विराटचं हे ४८ वं एकदिवसीय शतक होतं. सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम आता त्याला खुणावत होता. भारताने हा सामनाही ४२व्या षटकांत ७ गडी राखून आरामात जिंकला.

गुणतालिकेत आता भारतीय संघाची स्पर्धा मोठाले विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंडशी होती. (Ind vs Aus World Cup Final)

२२ ऑक्टोबर २०२३, धरमशाला (वि. न्यूझीलंड)

म्हणता म्हणता गुणतालिकेतील दोन अव्वल संध धरमशालामध्ये आमने सामने ठाकले. तोपर्यंत स्पर्धेत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या अव्वल संघांना नेदरलँड्स आणि अफगाणिस्तानकडून धक्के बसलेले होते. त्यामुळे सगळ्यांची नजर या सामन्यावर होती. ही वर्चस्वाची लढाई होती. पण, वर्चस्व भारताने गाजवलं.

पहिली फलंदाजी करत न्यूझीलंडने २७३ धावा केल्या. डॅरिल मिचेलच्या १३० धावा आणि रचिन रवींद्रच्या ७५ धावा हे त्यांच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. हार्दिक नसल्यामुळे संघात सुर्यकुमार यादव आणि महम्मद शामी आले होते. शामीने या पहिल्याच सामन्यात ५४ धावा देत ५ बळी मिळवले.

आणि विजयासाठी आवश्यक २७४ धावा करताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरत ९५ धावा केल्या. शतक पूर्ण करण्याच्या नादात मोठा फटका खेळताना तो बाद झाला. रवी जाडेजा ३९ धावांवर नाबाद राहिला. हा विजय मिळून भारताने गुणतालिकेतही अव्वल स्थान मिळवलं. (Ind vs Aus World Cup Final)

(हेही वाचा – Ind vs Aus Final : जाणून घ्या फायनलसाठी कशी असणार खेळपट्टी)

२९ ऑक्टोबर २०२३, लखनौ (वि. इंग्लंड)

भारतीय संघाला मध्ये ७ दिवसांची विश्रांती मिळाली होती. आणि पुढील सामना गतविजेत्या इंग्लंडबरोबर होता. इंग्लिश संघ फॉर्ममध्ये नसला तरी त्यांना कमी लेखून चालणार नव्हतं. लखनौच्या एकाना स्टेडिअमची खेळपट्टी गोलंदाजीला साथ देणारी होती. आणि अशावेळी भारतीय संघाने पन्नास षटकांत ९ गडी बाद २२९ धावा केल्या. विराट शून्यावर बाद झाला. तर रोहीतने ८७ धावा केल्या. सुर्यकुमार यादवने ४९ धावा करून संघाला २२५ धावांचा टप्पा ओलांडून दिला.

पण, या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लिश संघ पूर्णपणे ढेपाळला. ३५ षटकांतच त्यांचा संघ १२९ धावांत गुंडाळला गेला. या सामन्यात पहिल्यांदा जसप्रीत बुमरा, सिराज आणि शामीची एकत्र ताकद दिसली. बुमराने ३ तर शामीने ४ गडी बाद केले. भारतीय संघाचं स्पर्धेतील वर्चस्व आता उघड झालं होतं. कारण, हा एकमेव संघ आतापर्यंत अपराजित होता. (Ind vs Aus World Cup Final)

२ नोव्हेंबर २०२३, मुंबई (वि. श्रीलंका)

आता भारतीय संघ या स्पर्धेतील एक बलाढ्य आणि फॉर्ममध्ये असलेला संघ होता. फलंदाज आणि गोलंदाजांचा आत्मविश्वासही दुणावलेला होता आणि अशावेळी संघाचा पुढील मुकाबला मुंबईत श्रीलंकेविरुद्ध झाला. भारताने पहिली फलंदाजी घेतली आणि रोहित झटपट बाद झाला असला तरी शुभमन गिल (९२), विराट कोहली (८८) आणि श्रेयस अय्यरने ८२ धावा करून संघाला ३५७ धावसंख्या गाठून दिली. श्रेयसने ६ षटकार ठोकले आणि टीकाकारांना चांगलंच उत्तर दिलं.

भारतीय फलंदाजी मजबूत होती हे एव्हाना सगळ्यांनाच माहीत होतं. पण, खरी मजा आणली ती भारतीय गोलदाजांनी. जसप्रीत बुमरा, सिराज आणि शामी यांनी लंकन फलंदाजांना काही कळण्याच्या आत त्यांचा संबंध डाव ५५ धावांत गुंडाळला. पुन्हा एकदा शामीने सामन्यांत ५ गडी बाद केले. (Ind vs Aus World Cup Final)

(हेही वाचा – World Cup Final Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताचा भर ‘या’ पाच मुद्दयांवर)

५ नोव्हेंबर २०२३, कोलकाता (वि. दक्षिण आफ्रिका)

ही पुन्हा एकदा वर्चस्वाची लढाई होती. कारण, नेदरलँड्सकडून हरल्यानंतर डिवचलेली दक्षिण आफ्रिका आता मोठे विजय मिळवत होती आणि म्हणता म्हणता त्यांनी न्यूझीलंडला मागे टाकून गुणतालिकेतही आघाडी घेतली होती. भारतापेक्षा त्यांचा एक विजय कमी होता. पण, भारतीय संघ एक सामनाही कमी खेळला होता. त्यामुळे आपल्या आधी एक विजय मिळवून आफ्रिकन संघ नेहमीच गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचायचा.

पण, कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरील त्या सामन्यात आफ्रिकेला भारताच्या पुढे जाता आलं नाही. आफ्रिकन संघाने आतापर्यंत धावांचा पाठलाग करत विजय मिळवला नव्हता आणि इथंही त्यांना ते जमलं नाही.

सामना सगळ्यांच्या लक्षात राहिला तो विराट कोहलीने ३५ व्या वाढदिवशी केलेल्या विक्रमी ४९ व्या शतकामुळे. श्रेयस अय्यरने ७७ धावा करत त्याला चांगली साथ दिली आणि भारताने निर्धारित ५० षटकांत ३२६ धावा केल्या आणि वर म्हटल्या प्रमाणे आफ्रिकन संघाला धावांचा पाठलाग करणं जमलंच नाही. उलट त्यांचा अख्खा संध ८३ धावांत बाद झाला. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर रवी जाडेजाने ५ आणि कुलदीप यादवने २ गडी बाद केले. (Ind vs Aus World Cup Final)

(हेही वाचा – World Cup Final Ind vs Aus : साखळी सामन्यात जेव्हा ऑस्ट्रेलियाने भारताची अवस्था ३ बाद २ अशी केली होती)

१२ नोव्हेंबर २०२३, बंगळुरू (वि. नेदरलँड्स)

भारताचा आता शेवटचा साखळी सामना नेदरलँड्स विरुद्ध बंगळुरूमध्ये होता. हे मैदान लहान असल्यामुळे सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय फलंदाजांकडून ४०० धावांची अपेक्षा होत होती. नशिबाने रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. आणि ही अपेक्षाही पूर्ण झाली. श्रेयस अय्यरने १२८ आणि के एल राहुलने १०२ धावा केल्या. तर नेदरलँड्सचा संघ २५० धावांवर बाद झाला. या सामन्यात रोहीतने ८ गोलंदाज वापरले आणि त्यापैकी त्याने स्वत: आणि विराटने एकेक बळीही मिळवला. भारतीय संघ आता साखळीतील ९ पैकी ९ सामने जिंकून उपांत्य फेरी खेळणार होता.

उपांत्य फेरीत भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होता आणि आधीच्या सामन्यातील झंझावात भारताने कायम ठेवला. ३९७ धावा करत त्यांनी न्यूझीलंडला ३२७ धावांत गुंडाळलं. (Ind vs Aus World Cup Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.