Ind vs Eng, 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची इंग्लंडवर १४२ धावांनी मात, मालिकाही ३-० ने जिंकली

Ind vs Eng, 3rd ODI : शुभमन गिलने या सामन्यात शतक झळकावलं.

48
Ind vs Eng, 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची इंग्लंडवर १४२ धावांनी मात, मालिकाही ३-० ने जिंकली
  • ऋजुता लुकतुके

अहमदाबाद एकदिवसीय सामना १४२ धावांनी जिंकत भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची ही मालिकाही ३-० ने खिशात टाकली आहे. चॅम्पियन्स करंडकापूर्वीची तयारीची मालिका असं तिच्याकडे पाहिलं जात होतं आणि ते पाहता भारतासाठी जमेच्या अनेक गोष्टी आहेत. ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर बॅकफूटवर गेलेले फलंदाज इथं मात्र चमकले. रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि आता विराट कोहलीनेही धावा केल्या. तर फिरकीपटूंनी कायम डावावर वर्चस्व गाजवलं आणि ३ पैकी २ सामन्यांत त्यांनी इंग्लिश संघ सर्वबाद केला. (Ind vs Eng, 3rd ODI)

अहमदाबादमध्ये इंग्लिश कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून भारताला पहिली फलंदाजी दिली आणि या संधीचा भारताने पुरपूर फायदा उचलला. रोहित शर्मा एका धावेवर बाद झाला. पण, त्यानंतर शुभमनने आधी विराटबरोबर आणि मग श्रेयसबरोबर शतकी भागिदारी रचली. पहिल्या पॉवरप्लेपासून भारतीय संघ तीनशेच्या वर जाणार हे दिसत होतं. अखेर शुभमन (११२), विराट (५२), श्रेयस (७८) आणि के. एल. राहुलने ४० धावा केल्या. याच्या जोरावर भारताने ५० षटकांत ३५६ धावा केल्या. विराटला अखेर सूर गवसला आणि त्याने ५५ धावांच्या खेळीत १ षटकार आणि ७ चौकार लगावले. तर शुभमनने या मालिकेत २ अर्धशतकं आणि १ शतक केलं. (Ind vs Eng, 3rd ODI)

(हेही वाचा – १९८४च्या शीख विरोधी दंगलीत Congressचा माजी खासदार दोषी; १८ फेब्रुवारीला न्यायालय ठोठावणार शिक्षा)

हे आव्हान इंग्लिश संघासाठी कठीणच होतं. त्यातच फिरकीचा मारा सुरू झाल्यावर ते आणखी कठीण झालं. डकेट आणि सॉल्ट यांनी ६० धावांची सलामी संघाला करून दिली. पण, ही जोडी सातव्या षटकांत अर्शदीपने फोडली. त्यानंतर त्याने फिल सॉल्टलाही बाद केलं आणि पुढे फिरकीपटूंनी काम फत्ते केलं. अर्शदीप, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. तर वॉशिंग्टन आणि कुलदीप यांनी एकेक बळी मिळवला. इंग्लिश संघ विजयाच्या जवळ कधी नव्हताच आणि २१४ धावांत सर्वबाद झाल्यावर भारताचा विजय साकार झाला. मालिकेत सातत्यपूर्ण धावा करणारा शुभमन गिल सामनावीर आणि मालिकावीर ठरला. (Ind vs Eng, 3rd ODI)

अहमदाबादमध्ये गिल चांगल्याच फॉर्ममध्ये होता. रोहित लवकर बाद झाल्यावर त्याने खेळाची सूत्र आपल्या हातात घेतली. आणि दुसऱ्या बाजूला सुरुवातीला चाचपडणाऱ्या विराटलाही सांभाळून घेतलं. १०२ चेंडूंत ११२ धावा करताना त्याने ३ षटकार आणि १२ चौकार ठोकले. अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडिअम शुभमनसाठी लाभदायी ठरलंय आणि इथं त्याने कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय सामन्यातही शतक ठोकलं आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ १५ फेब्रुवारीला चॅम्पियन्स करंडकासाठी दुबईला रवाना होईल. (Ind vs Eng, 3rd ODI)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.