Ind vs Eng 3rd Test : राजकोट कसोटी जिंकून भारताच्या नावावर जमा झाले ‘हे’ विक्रम

भारतीय संघाने राजकोट कसोटी ४३४ धावांनी जिंकली. 

216
Ind vs Eng 3rd Test : राजकोट कसोटी जिंकून भारताच्या नावावर जमा झाले ‘हे’ विक्रम
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धची तिसरी कसोटी ४३४ धावांनी जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या कसोटीत भारतीय संघाने प्रत्येक दिवसावर वर्चस्व गाजवलं. भारताकडून या कसोटीत २ शतकं आणि १ द्विशतक झालं. शिवाय एका गोलंदाजाने ५ बळी मिळवले तर आणखी एका गोलंदाजाने डावात ४ बळी टिपले. म्हणजेच भारताचा खेळ अष्यपैलू होता. याउलट इंग्लंडकडून बेन डकेट या एकट्या फलंदाजाने दीडशतक करून थोडीफार लढत दिली. बाकी इंग्लंडचे सगळेच डावपेच या कसोटीत त्यांच्यावरच उलटले. आणि या दमदार विजयाबरोबरच भारतीय संघाने आणि यशस्वी जयस्वालने काही विक्रमही आपल्या नावावर केले. (Ind vs Eng 3rd Test)

भारताचा सर्वात मोठा विजय

भारतीय संघाचा (Indian team) हा आतापर्यंतचा कसोटीतील सगळ्यात मोठा विजय होता. यापूर्वी २०२१ मध्ये भारताने न्यूझीलंड विरुद्धची कसोटी ३७२ धावांनी जिंकली होती. भारतीय संघाने विजयासाठी ५५७ धावांचं आव्हान दिलं असताना इंग्लिश संघ ४० षटकांतच १२४ धावांत सर्वबाद झाला. भारतासाठी रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावांत ५ बळी मिळवले. (Ind vs Eng 3rd Test)

भारतीय संघाने (Indian team) राजकोटच्या खेळपट्टीवर पहिल्या डावात ४४५ आणि दुसऱ्या डावात ४ बाद ४३० धावा केल्या. तर इंग्लंडचा संघ ३१९ आणि १२२ धावांत गारद झाला. (Ind vs Eng 3rd Test)

भारताकडून पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी शतकं झळकावली. तर दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) कमाल करताना कसोटी क्रिकेटमधील सलग दुसरं द्विशतक झळकावलं. २१४ धावांवर तो नाबाद राहिला. (Ind vs Eng 3rd Test)

खरंतर या कसोटीपूर्वी भारताचे प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. विराटही अनुपलब्ध होता. त्यामुळे भारतीय फलंदाजी नवखी भासत होती. पण, सर्फराझ खान आणि ध्रुव जुरेल यांनी कसोटी पदार्पणातच आपली उपयुक्तता सिद्ध केली. सर्फराझने दोन्ही डावात अर्धशतकं केली. तर जुरेलने चांगल्या यष्टीरक्षणाबरोबरच पहिल्या डावात समयोचित ४६ धावा केल्या. (Ind vs Eng 3rd Test)

(हेही वाचा – Shiv Jayanti 2024 : जनतेच्या मनामनात शिवकार्याची प्रेरणा निर्माण करुया – उपमुख्यमंत्री अजित पवार)

राजकोट कसोटीत भारताने केलेले काही विक्रम पाहूया,
  • भारतीय संघाने कसोटी ४३४ धावांनी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना मिळवलेला हा भारताचा सगळ्यात मोठा विजय आहे.
  • यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) दुसऱ्या डावात नाबाद २१४ धावा करताना १२ षटकार लगावले. एका डावात सर्वाधिक षटकार खेचण्याच्या वसिम अक्रमच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली.
  • जयस्वालने आतापर्यंत या मालिकेत २२ षटकारांची बरसात केली आहे. एका मालिकेत सर्वाधिक षटकारांचा हा विक्रम आहे. अजून २ कसोटी बाकी आहेत.
  • जयस्वालने कारकीर्दीत झळकावलेली पहिली तीन शतकं ही १५० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची आहेत. ही कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज आहे.
  • कसोटीत २ द्विशतकं नावावर असलेला यशस्वी (Yashasvi Jaiswal) हा भारताचा वयाने सगळ्यात लहान फलंदाज आहे. राजकोट कसोटीत द्विशतक झळकावलं तेव्हा तो २२ वर्षं आणि ४९ दिवसांचा होता.
  • लागोपाठ २ कसोटींत द्विशतक झळकावलेला विनोद कांबळी आणि विराट कोहली नंतरचा तो फक्त तिसरा भारतीय फलंदाज आहे.
  • भारतीय फलंदाजांनी राजकोटमध्ये इंग्लंड विरुद्ध एकूण २८ षटकार मारले. यात एकट्या यशस्वीने दुसऱ्या डावात १२ षटकार खेचले. यापूर्वी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका कसोटीत २७ षटकार लगावले होते.
  • एका मालिकेत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम आता यशस्वीच्या (Yashasvi Jaiswal)  नावावर आहे. त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे.
  • सर्फराझ खान हा कसोटी पदार्पणात दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा चौथा भारतीय फलंदाज आहे.
  • कसोटीच्या दोन्ही डावांत ४०० पेक्षा जास्त धावा करण्याची कामगिरी भारताने २००९ नंतर पहिल्यांदा केली आहे.
  • यशस्वी आणि सर्फराझने राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद १७२ धावांची भागिदारी रचली. त्यांची धावगती होती ६.५३ धावांची. कसोटीच्या इतिहासात ही सातवी सगळ्यात जलद १५० धावांची भागिदारी आहे.
  • भारताने इंग्लंडसमोर ५५७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे भारताचं दुसऱ्या क्रमांकाच सर्वोच्च लक्ष्य आहे. (Ind vs Eng 3rd Test)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.