- ऋजुता लुकतुके
बंगालचा २७ वर्षीय तेज गोलंदाज आकाशदीपसाठी रांची कसोटीचा पहिला दिवस आणि त्यातही पहिलं सत्र चांगलंच यशदायी ठरलं. चेंडूचा अचूक टप्पा पकडत आणि लयबद्ध गोलंदाजी करत त्याने या सत्रात २७ धावांत ३ महत्त्वाचे बळी टिपले. इंग्लंडची आघाडीची फळी त्याने नेस्तनाबूत केली. इंग्लंडचा डाव आटोपल्यानंतरही या कामगिरीची चर्चा होत राहिली. कारण, आकाशदीपला मिळालेल्या यशानंतर इंग्लंडने ३५३ धावा गाठल्या. त्यांना अडचणीत आणलं ते एकट्या आकाशदीपने. (Ind vs Eng 4th Test)
Words that inspire 🗣️ ft. Rahul Dravid
Dreams that come true 🥹
A debut vision like never seen before 🎥
Akash Deep – What a story 📝#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vSOSmgECfC
— BCCI (@BCCI) February 23, 2024
बुमराच्या सल्ल्यामुळेच ही कामगिरी शक्य – आकाशदीप
आकाशने पदार्पणातील ही कामगिरी वडिलांच्या स्मृतीला अर्पण केली आहे. वडिलांचा क्रिकेटला विरोध असला तरी त्यांच्या अकाली मृत्यूने आकाशला बरंच काही शिकवलं. वडिलांबरोबरच आकाशदीपने या कामगिरीचं श्रेय दिलं आहे ते भारताचा आघाडीचा तेज गोलंदाज आणि कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराला. (Ind vs Eng 4th Test)
बुमराच्या सल्ल्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली, असं आकाशदीप सांगतो. ‘राजकोट कसोटीसाठी संघात आलो तेव्हापासून बुमरा एकच गोष्ट मला सांगत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चेंडूचा टप्पा आम्ही थोडा पुढे ठेवतो. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर फलंदाज चेंडूचा पाठलाग करतात. त्यामुळे इथं टप्पा काही इंच आखूड ठेवायचा, असं मला बुमराने सांगितलं. आणि अचूक टप्प्याच्या गोलंदाजीमुळेच मी तीन बळी मिळवू शकलो,’ असं आकाशने पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या कसोटीत नवीन चेंडूपेक्षा जुन्या चेंडूने गोलंदाजी करणं जास्त सोपं आहे. कारण नवीन चेंडू चांगलाच स्विंग होतोय, असं त्याचं मत आहे. इंग्लंड संघाने पहिल्या डावात ३५३ धावा केल्या. आणि यात आकाशदीपने ९१ धावांत ३ बळी मिळवले. (Ind vs Eng 4th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community