Ind vs Eng, 5th T20 : अभिषेक शर्माचं ३७ चेंडूंत शतक, युवराज, सचिनकडून कौतुक 

Ind vs Eng, 5th T20 : अभिषेकनं भारताकडून सर्वोच्च टी-२० धावसंख्य रचली आहे 

180
Ind vs Eng, 5th T20 : अभिषेक शर्माचं ३७ चेंडूंत शतक, युवराज, सचिनकडून कौतुक 
Ind vs Eng, 5th T20 : अभिषेक शर्माचं ३७ चेंडूंत शतक, युवराज, सचिनकडून कौतुक 
  • ऋजुता लुकतुके 

रविवारी मुंबईत अभिषेक शर्मा नावाच्या वावटळाने वानखेडे स्टेडिअम दणाणून सोडलं. ५४ चेंडूंत १३५ धावा करताना त्याने १३ षटकार आणि ८ चौकारांची आतषबाजी केली. या वावटळात इंग्लिश संघ अगदी धुवून निघाला. आणि ही कामगिरी करताना अभिषेकने काही विक्रमांचीही मोडतोड केली. अभिषेकचं हे दुसरं टी-२० शतक होतं. आणि यात त्याने शुभमन गिलचा जुना विक्रम मोडीत काढला. आता अभिषेकच्या नावावर टी-२० तील भारतीय फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या जमा झाली आहे. यापूर्वी २०२३ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध शुभमन गिलने १२६ धावा केल्या होत्या. पण, गिलचा स्ट्राईक रेट २०० होता. तो अभिषेकचा २५० धावांचा होता! (Ind vs Eng, 5th T20)

(हेही वाचा- )

या खेळीनंतर अभिषेकवर सर्वबाजूने कौतुकाचा वर्षाव होत आहे. पहिलं अभिनंदनपर ट्विट पडलं ते साक्षात सचिन तेंडुलकरचं. अभिषेकच्या आत्मविश्वासपूर्ण फटकेबाजीचं सगळ्यांनी कौतुक केलं आहे. (Ind vs Eng, 5th T20)

 अभिषेक शर्मा युवराज सिंगच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे. आणि त्याची झलक डावखुऱ्या सलामीवीराच्या फलंदाजीतही दिसते. चौकारांपेक्षा त्याचा षटकारांवर जास्त विश्वास आहे. आणि अभिषेकने १५-१६ षटकांपर्यंत टिकून दाखवावं तर सामन्याचा नूर तो पालटवू शकतो, असं युवराज त्याच्याबद्दल म्हणायचा. तेच अभिषेकने मुंबईत करून दाखवलं. रोहित शर्माचा डावांत सर्वाधिक षटकारांचा विक्रमही यावेळी त्याने मोडला. यापूर्वी रोहितने एका टी-२० खेळीत १० षटकार ठोकले होते. अभिषेकने इंग्लंडविरुद्ध १३ षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळे युवराज सिंगही आपल्या शिष्यावर खुश होता. (Ind vs Eng, 5th T20)

 ‘मला तुझ्याकडून अशाच खेळीची अपेक्षा होती. तुझा आज मला अभिमान वाटतो,’ असं युवराजने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आणि सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिषेकनेही युवराज सिंगबद्दल याच भावना व्यक्त केल्या आहेत. ‘ही खेळी युवी पाजींना आवडेल. कारण, ते नेहमी मला १५ षटकं खेळण्याचं लक्ष्य समोर ठेवायला सांगायचे, असं अभिषेकने बोलून दाखवलं. (Ind vs Eng, 5th T20)

 इंग्लंडवर संपूर्ण वर्चस्व गाजवत भारताने ही मालिका ४-१ ने जिंकली आहे. आता भारत व इंग्लंड दरम्यान एकदिवसीय मालिका सुरू होईल. पहिला सामना ३ फेब्रुवारीला नागपूर इथं होणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा रोहित शर्मा, विराट कोहली व रिषभ पंत भारतीय संघातून खेळताना दिसतील. (Ind vs Eng, 5th T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.