Ind vs NZ, 1st Test : बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचं पारडं जड, १३४ धावांची आघाडी

Ind vs NZ, 1st Test : पहिल्या डावात भारतीय संघाचा ४६ धावांतच खुर्दा उडाला. 

52
Ind vs NZ, 1st Test : बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचं पारडं जड, १३४ धावांची आघाडी
  • ऋजुता लुकतुके

बंगळुरू कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने कसोटीवर जोरदार पकड मिळवली आहे. एकतर भारतीय संघाला पहिल्या डावात त्यांनी ४६ धावांमध्येच गुंडाळलं आणि त्यानंतर दिवसअखेर ३ बाद १८३ धावा केल्या आहेत. त्यामुळे किवी संघाकडे आता १३४ धावांची आघाडी आहे. कसोटीचे ३ दिवस अजून बाकी आहेत. गुरुवारी सकाळी ढगाळ वातावरणच होतं आणि खेळपट्टीही ओलसर होती. असं असताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने आश्चर्यकारकरित्या पहिली फलंदाजी घेतली आणि संघातही तीन फिरकीपटू घेतले.

परिणाम असा झाला की, भारतीय संघ अनियमित उसळी आणि चेंडूला चांगला स्विंग मिळत असताना भारतीय फलंदाज गोंधळले. किवी गोलंदाजांनी या खेळपट्टीचा अचूक फायदा उचलत भारतीय डाव ४६ धावांतच गुंडाळला. विराट कोहली, सरफराज सह एकूण ५ फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. भारतीय संघाची मायदेशातील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. तर २०२० मध्ये ॲडलेड कसोटीत भारतीय संघ ३६ धावांत सर्वबाद झाला होता. ती भारताची नीच्चांकी धावसंख्या आहे. बंगळुरूमध्ये भारताला बसलेला हा पहिली धक्का होता आणि त्यानंतर उर्वरित काम डेव्हॉन कॉनवे आणि विल यंग या किवी फलंदाजांनी केलं. दोघांनी ७५ धावांची भागिदारी रचताना सामना न्यूझीलंडच्या पारड्यात आणला.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : बंडखोरीची धास्ती, सर्वच पक्ष उमेदवारी शेवटच्या ४८ तासांत घोषित करणार)

गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा पाऊस पडला आणि त्यामुळे सकाळच्या सत्रात फलंदाजांची परीक्षाच होती. त्या परिक्षेत भारतीय फलंदाज नापास झाले आणि दुपारनंतर पाऊसही थांबला. सूर्यप्रकाशामुळे खेळपट्टीही फलंदाजीसाठी योग्य झाली. याचा फायदा उचलत किवी फलंदाजांनी धावा वाढवत नेल्या. खासकरून सलामीवीर डेव्हॉन कॉनवे पहिल्या चेंडूपासून लयीत खेळत होता. त्याने १०५ चेंडूंतच ९१ धावा केल्या. यात त्याने ३ षटकार आणि ८ चौकार ठोकले.

एकट्या कॉनवेच्याच धावा भारताच्या दुप्पट होत्या. विल यंगने ३३ धावा करत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून डावखुरे फिरकीपटू रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव प्रभावी ठरले. दोघांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. न्यूझीलंडकडे आता १३४ धावांची आघाडी आहे. कसोटीचे ३ दिवस बाकी आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.