- ऋजुता लुकतुके
बंगळुरू कसोटी तिसऱ्या दिवशी रंगतदार वळणावर उभी आहे. पण, अजूनही वर्चस्व न्यूझीलंड संघाकडेच आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात ४०२ धावांची मजल मारली तिथेच त्यांच वर्चस्व प्रस्थापित झालं. रचिन रवींद्र १३४ तर टीम साऊदीने ६५ धावा केल्या. त्यामुळे त्यांच्याकडे पहिल्या डावात तब्बल ३५६ धावांची आघाडी आली. पण, दुसऱ्या डावात भारतीय संघाने ३ बाद २३१ धावा करत प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय संघ आता १२५ धावांनी पिछाडीवर आहे आणि कसोटीचे दोन दिवस बाकी आहेत. सर्फराझ ७० धावांवर खेळतोय. राहुल आणि रिषभ यांच्यासह तो शनिवारी किती धावा वाढवतो यावर या कसोटीचा निकाल आता अवलंबून आहे. विराट कोहली दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर ७० धावांवर बाद झाला.
त्यापूर्वी तिसऱ्या दिवशी जराही पाऊस झाला नाही. त्यामुळे खेळपट्टी उन्हात न्हाऊन निघाली आणि फलंदाजीसाठी एकदम तयार होती. या परिस्थितीचा फायदा किवी फलंदाजांनी सगळ्यात आधी उचलला. रचिन रवींद्राने १५७ चेंडूंत १३४ धावा करताना भारतीय फिरकीपटूंचा यथेच्छ समाचार घेतला. त्याला टीम साऊदीने ६५ धावा करत चांगली साथ दिली. दोघांनी मिळून तब्बल ८ षटकार ठोकले. षटकामागे साडेपाचच्या गतीने धावा वाढवत त्यांनी पहिल्या डावात किवी संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. भारताकडून जाडेजा आणि कुलदीपने प्रत्येकी ३ बळी मिळवले.
(हेही वाचा – Mahavikas Aghadi मध्ये बिघाडी सुरू; काँग्रेस-उबाठा बोलणी बंद)
A good day for 🇮🇳 with the bat, but not the way we wished to end 💔#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #INDvNZ pic.twitter.com/NTWeoFMtUn
— Mumbai Indians (@mipaltan) October 18, 2024
न्यूझीलंड प्रमाणेच भारतानेही आपल्या डावाची आक्रमक सुरूवात केली. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी ७२ धावांची सलामी भारताला करून दिली. पण, जयसवाल चांगला जम बसलेला असताना चुकीचा फटका खेळून ३५ वर यष्टीचीत झाला. त्यानंतर रोहितने अर्धशतक झळकावलं खरं. पण, तो ५२ धावांवर विचित्र पद्धतीने त्रिफळाचीत झाला. चेंडू तटवल्यानंतर तो मागे गेला. जमिनीवर टप्पा पडून तो चक्क यष्टीवर गेला आणि दोन्ही बेल उडल्यामुळे रोहितला तंबूत परतावं लागलं. भारताची अवस्था तेव्हा २ बाद ९५ होती आणि विराट कोहली काहीसा चाचपडत खेळत होता. पण, त्यानंतर विराटला लय सापडली आणि त्याची सर्फराझशी जोडी जमली. दोघांनी मिळून ४ षटकार आणि १५ चौकार ठोकले. आणि १३६ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. नाही म्हणायला विराटला एकदा स्लिपमध्ये जीवदान मिळालं. पण, त्याखेरिज दोघंही भक्कम खेळत होते.
शेवटची ३-४ षटकं बाकी असताना दोघांनी जपून खेळण्याचा पवित्रा घेतला होता. पण, अचानक दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सचा चेंडू जराही वळला नाही. आणि विराटच्या बॅटची अलगद कड घेऊन यष्टीरक्षकाकडे गेला. विराट सारखा फलंदाज असा बाद झाल्यामुळे भारतीय संघ दिवसअखेर काहीसा बॅकफूटवर गेला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community