रविवारी न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला. मात्र, या रद्द झालेल्या सामन्यातूनही भारतीय संघाने अनोखा विश्वविक्रम नोंदवला. कोणत्याही कारणामुळे रद्द झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने अव्वल स्थान मिळवताना न्यूझीलंडला मागे टाकले. भारताचे आतापर्यंत 42 एकदिवसीय सामने रद्द झाले असून, न्यूझीलंडचे 41 सामने रद्द झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंडचे सर्वाधिक सामने रद्द झाले आहेत. भारताच्या रद्द झालेल्या सामन्यांमध्ये श्रीलंकाविरुद्धच्या सामन्यांची संख्या सर्वाधिक आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध 162 एकदिवसीय सामने खेळले असून यापैकी 11 सामने रद्द झाले आहेत. 2002 साली भारत- श्रीलंका यांच्यामध्ये झालेला चॅम्पियन्स ट्राॅफीचा सामनाही रद्द झाला होता.
( हेही वाचा: श्रद्धा हत्याकांड: ‘तो’ एक फोन आणि आफताबने पुरावे नष्ट करण्यास केली सुरुवात )
…म्हणूनही झालेत सामने रद्द
सामने पावसामुळेच रद्द झाले असेही नाही. 1989 मध्ये पाकविरुद्ध सामना प्रेक्षकांच्या बेशिस्तीमुळेही रद्द केला. त्यावेळी 3 बळी झटपट बाद झाल्यानंतर पाक समर्थकांनी मैदानात दगडफेक केली. 2009 मध्ये भारत- श्रीलंका लढत खराब खेळपट्टीमुळे रद्द झाली होती. 1997 साली इंदूर येथील भारत- श्रीलंका सामनाही खराब खेळपट्टीमुळे होऊ शकला नाही.