Ind vs NZ Preview : भारताला घ्यायचाय २०१९ च्या उपान्त्य लढतीचा बदला

126
  • ऋजुता लुकतुके

रोहीत शर्माचा भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत सुसाट आहे. ९ पैकी ९ सामने त्यांनी जिंकले आहेत. आणि ते सुद्धा वर्चस्व गाजवत. संघर्षाचे प्रसंग आले. नाही असं नाही. अगदी पहिल्याच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पहिले तीन गडी ३५ धावांत गेले होते. तर दुसऱ्याच सामन्यात अष्टपैलू हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला. संघाचं संतुलनच बिघडलं. आधीच सलामीवीर शुभमन गिल डेंग्यूने आजारी होता.

पण, अशा प्रत्येक प्रसंगी संघातील कुणीतरी मदतीला धावून आलं. नुसतं धावून नाही आलं तर त्यांनी अख्खी जबाबदारीच खांद्यावर घेतली. सध्या हा संघ सहा तज्ज फलंदाज, एक फिरकीपटू अष्टपैलू आणि पाच तज्ज गोलंदाज घेऊन खेळतोय. म्हणजे एकाने जरी जबाबदारी निभावली नाही, तर त्याचं दडपण इतर दहा खेळाडूंवर येणार.

पण, अशी वेळ संघावर आली तरी इतरांनी सांभाळून घेतलंय. कारण, संघातील सगळेच खेळाडू तुफान फॉर्ममध्ये आहेत. रोहीत आणि शुभमन ही अशी सलामीची जोडी आहे, जिने या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी सलामी दिल्यात. तर विराट कोहली या स्पर्धेतील सध्याचा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या पाठोपाठ येणारे दोन फलंदाज श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या पाठीशीही ताजी ताजी शतकं आहेत. श्रेयस अय्यरचा सर्वात लांब षटकाराचा विक्रम आहे.

कुलदीप आणि रवींद्र जाडेजा यशस्वी फिरकीपटू आहेत. आणि त्यानंतर आहे या स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी तेज गोलंदाजीचं त्रिकुट – जसप्रीत बुमरा, महम्मद सिराज आणि महम्मद शामी यांचं. या तिघांबद्दल तर अख्खं क्रिकेट विश्व बोलतंय. भारतातील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या हे तिघे मर्दुमकीने गाजवतायत. असा हा जमून आलेला संघ विजयाच्या भन्नाट लयीत आहे. आणि आता उपान्त्य सामन्यात त्यांच्यासमोर मुंबईत आव्हान उभं आहे ते न्यूझीलंडचं.

(हेही वाचा वानखेडेवर होणाऱ्या IND vs NZ Semi Final सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार; मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश)

२०१९ च्या विश्वचषकातील एक कटू आठवण भारतीय संघाच्या मनात ताजी असेल. साखळी सामन्यांनंतर अव्वल असलेला भारतीय संघ तेव्हा न्यूझीलंडकडून उपान्त्य सामन्यात (Ind vs NZ) थोडक्यात पराभूत झाला होता. महत्त्वाचं म्हणजे त्या सामन्यांत रोहीत, विराट आणि राहुल हे तीन भारतीय फलंदाज प्रत्येकी एक धाव करून बाद झाले होते. आता या तिघांनाही संधी आहे या पराभवाचा वचपा काढण्याची. रोहीत शर्माच्या कप्तानीखाली हा संघ मैदानावर आणि मैदानाबाहेरही जमून आलेला संघ आहे.

आणि अशा भारतीय संघाशी पुन्हा एकदा दोन हात करण्याचं आव्हान किवी संघासमोर असेल. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने भारतात भारताविरुद्ध खेळणं म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव घेतलाय. म्हणूनच उपान्त्य सामन्यापूर्वी तो म्हणतो, ‘मैदानात ११ ब्लू जर्सीवाले खेळाडू खेळत असतील. आणि प्रेक्षकांमध्ये हजारो ब्लू जर्सीवाले बसलेले असतील. आणि त्यांच्यामध्ये आम्हाला खेळायचं आहे.’ विल्यमसनचं म्हणणं बरोबरच आहे.

त्याच्याही संघात या स्पर्धेतील आतापर्यंतचा दुसरा यशस्वी फलंदाज रचिन रवींद्र आहे. सहाव्या क्रमांकाच्या ग्लेन फिलिपपर्यंत तगडी फलंदाजी आहे. आणि ट्रेंट बोल्ट तसंच टीम साऊदी असा गोलंदाजीचा तोफखाना आहे. मिचेल सँटरकडून भारताविरुद्ध संघाला विशेष अपेक्षा असतील. किवी संघाने या स्पर्धेत प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींचा सर्वाधिक फटका खाल्ला आहे. पण, त्यातून प्रत्येक वेळी संघ वर आला आहे. आताही उपान्त्य सामन्यात (Ind vs NZ) ते तगडं आव्हान उभं करणार आहेत हे नक्की.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.