- ऋजुता लुकतुके
भारतात अलीकडे झालेल्या बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकांमधील खेळपट्ट्यांचे आयसीसीचे अहवाल आता समोर आले आहेत. बांगलादेश विरुद्धच्या दोन्ही कसोटींत पावसामुळे फक्त २ ते ३ दिवसांचा खेळ होऊ शकला. तर न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरू कसोटीचा अपवाद सोडला तर पाऊस नाही पडला. पण, सामनेच २-३ दिवसांत संपले. पण, न्यूझीलंड विरुद्धच्या खेळपट्ट्या ‘चांगल्या’ होत्या असा शेरा सामनाधिकाऱ्यांनी दिला आहे. (Ind vs Ban, Test Series)
पण, बांगलादेश विरुद्धची कानपूरमधील खेळपट्टी असमाधानकारक होती, असं सांगून या खेळपट्टीला एक उणे गुण मिळाला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या मालकीचं हे मैदान आहे आणि इथं पाऊस झाल्यावर खेळपट्टी आणि आजूबाजूचं मैदान सुकवण्याची पुरेशी व्यवस्था नव्हती. फक्त २ सुपर सॉपर उपलब्ध होते. त्यामुळे मैदानातील आऊटफिल्ड ओलंच राहिलं. पाऊस गेल्यानंतरही फक्त दोन दिवसांचा खेळ इथं शक्य झाला. त्यामुळे मुख्य खेळपट्टी चांगली असतानाही सामनाधिकारी जेफ क्रो यांनी या मैदानाला असमाधानकारक असा शेरा मारला आहे. या मालिकेतील चेन्नई कसोटीची खेळपट्टी मात्र ‘अतिशय चांगली’ असल्याचा निर्वाळा जेफ क्रो यांनी दिला आहे. (Ind vs Ban, Test Series)
(हेही वाचा – L. K. Advani : स्वयंसेवक ते राजकारणी – एक संघर्ष यात्रा)
न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरू, पुणे आणि मुंबईतील सामने प्रत्येकी २ ते ३ दिवसांत संपले. पण, सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी या मालिकेतील तीनही खेळपट्ट्या ‘चांगल्या’ असल्याचा निर्वाळा दिला. वास्तविक बंगळुरू कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ एका सत्रातच ४६ धावांत सर्वबाद झाला होता. पण, त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आणि दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनीही शतकं केली. त्यामुळे ही खेळपट्टी चांगली ठरली आहे. (Ind vs Ban, Test Series)
तोच निकष पुणे आणि मुंबईच्या बाबतीत झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कसोटी खेळपट्टी असण्याचे निकष या खेळपट्ट्यांनी पूर्ण केले नाहीत. दोन्ही खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणाऱ्या होत्या. पण, तरीही फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी या खेळपट्टया ‘समाधानकारक’ असल्याचं म्हटलं आहे. समाधानकारक असलेल्या खेळपट्ट्यांवर भारतीय संघाचा पराभव झाल्याचं शल्य संघाला नक्की असणार आहे. (Ind vs Ban, Test Series)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community