रविवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात IND vs PAK Asia Cup 2023 सुपर-४चा सामना खेळला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे भारतीय डावात व्यत्यय आला आणि सामना राखीव दिवसापर्यंत पुढे ढकलण्यात आला. सोमवारी, सामना भारतीय डावाच्या जिथे थांबला होता तिथूनच सुरू होईल आणि सामना ५०-५० षटकांचा खेळला जाईल.
कोलंबोमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अशा स्थितीत संपूर्ण मैदानात कव्हर्स टाकण्यात आले आहे. आता हा सामना राखीव दिवशी होणार आहे. आज सामना पूर्ण होऊ शकला नाही. यामुळे हा सामना आता सोमवारी राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. पावसामुळे आज जिथे थांबला होता तिथूनच हा सामना सुरू होईल. म्हणजेच सामना भारतीय डावाच्या २४.१ षटकांपासून सुरू होईल. सोमवारी फक्त ५०-५० षटकांचे सामने खेळवले जातील. उद्याही पाऊस पडला तर डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला जाईल.
(हेही वाचा Ind-vs-Pak-Asia-Cup-2023 : पावसामुळे एक तासापासून सामना थांबला; रोहित-गिल दोघांनी मारले अर्ध शतक)
रविवारी सामना सुरू असताना काही तास पाऊस थांबला होता, मात्र मैदान ओले असल्याने त्याची दुरुस्ती करण्यास ग्राउंड स्टाफला वेळ लागला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही तासांनी पाऊस थांबला. मात्र, आऊटफील्ड ओले होते. रात्री ८.३० वाजता अंपायर्सनी पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. रात्री नऊ वाजता खेळ सुरू होणार असल्याची चर्चा होती. मात्र, साडेनऊ वाजता पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला आणि अंपायर्सनी सामना राखीव दिवशी हलविण्याचा निर्णय घेतला.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने २४.१ षटकांत २ गडी गमावून १४७ धावा केल्या. सध्या के.एल. राहुल २८ चेंडूत १७ धावा आणि विराट कोहली १६ चेंडूत ८ धावा करत फलंदाजी करत आहे. तिसर्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत ३८ चेंडूत २४ धावांची भागीदारी झाली आहे. आज कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिलचे वादळ पाहायला मिळाले. शुबमनने शाहीनच्या दोन षटकांत प्रत्येकी तीन चौकार मारले होते. यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांची लय बिघडली. रोहित आणि शुबमन यांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी शादाब खानने तोडली, त्याने कर्णधार रोहितला बाद केले. हिटमॅनने आपले ५०वे अर्धशतक झळकावले. त्याने ४९ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. दुसरीकडे त्याचा साथीदार शुबमनने एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. त्याला शाहीन आफ्रिदीने आगा सलमानकरवी झेलबाद केले. शुबमन ५२ चेंडूत दहा चौकारांच्या मदतीने ५८ धावा करून बाद झाला.
Join Our WhatsApp Community