- ऋजुता लुकतुके
पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडकाच्या आयोजनावर अजूनही वादविवाद सुरू आहे. भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही हे स्पष्ट नसल्यामुळे आयसीसीने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेले संबंध आणि पाकिस्तानमधील सुरक्षेच्या प्रश्नामुळे खेळाडूंना असलेला धोका लक्षात घेता भारत सरकारने भारतीय क्रिकेट संघाला शेजारी देशात पाठवण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थितीत हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा घेण्याची मागणी होत आहे. पण, त्यासाठी पाकिस्तानची तयारी नाही. अशावेळी आणखी एका भारतीय संघाने पाकिस्तानात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Ind vs Pak Cricket)
चॅम्पियन्स करंडकापूर्वी पाकिस्तानमध्ये अंधांच्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन होणार आहे. पण, परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय अंध क्रिकेटपटूंच्या संघाला टी-२० विश्वचषकासाठी पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे भारताला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. वास्तविक या स्पर्धेतील सहभागासाठी भारतीय अंध संघाला क्रीडा मंत्रालयाचं ना हरकत प्रमाणपत्र मिळालं होतं. पण, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने परवानगी नाकारल्यामुळे भारतीय संघाला हा निर्णय घ्यावा लागला. भारतीय नागरिकांना पाकिस्तानला जायचं असेल तर त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी लागते. (Ind vs Pak Cricket)
(हेही वाचा – Assembly Election 2024 : सत्ता कुणाचीही असो, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला रिपीट होणार)
इंडियन ब्लाइंड क्रिकेट असोसिएशन सरचिटणीस शैलेंद्र यादव यांनी मीडियाला ही माहिती दिली आहे. ‘परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला जाण्याची परवानगी दिली नाही आणि स्पर्धेतून माघार घेण्यास सांगितले आहे. सरकारकडून अधिकृत मान्यता न देणारे पत्र अद्याप त्यांना मिळालेले नाही, कारण हे तोंडी कळवण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय अंध संघ आता पाकिस्तानला जाऊ शकत नाही,’ असं यादव मीडियाशी बोलताना म्हणाले. (Ind vs Pak Cricket)
२३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये अंधांचा टी-२० विश्वचषक आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेची ही चौथी आवृत्ती आहे. याआधी अंधांच्या टी-२० विश्वचषकाचे ३ हंगाम झाले असून ते तीनही भारतीय संघाने जिंकले आहेत. भारतीय संघाने २०१२ आणि २०१७ मध्ये पाकिस्तानला हरवून हे विजेतेपद पटकावले होते. तर २०२२ मध्ये भारतीय संघाने अंतिम फेरीत बांगलादेशचा पराभव केला होता. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचाही असाच वाद सध्या सुरू आहे. केंद्र सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानला जाण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे भारताने हायब्रीड मॉडेलची शिफारस केली असली तरी पाकिस्तानची त्याला मान्यता नाही. टीव्ही प्रसारण करणाऱ्या वाहिन्यांना हायब्रीड मॉडेल मान्य नसल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. (Ind vs Pak Cricket)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community