ऋजुता लुकतुके
पाकिस्तानचा (Ind vs Pak) क्रिकेट संघ कडेकोट पोलीस बंदोबस्तात अहमदाबादला दाखल झाला आहे. विमानतळावरून थेट त्यांच्या बसमध्ये बसून संघ हॉटेलला रवाना झाला. तरीही हौशी चाहत्यांनी विमानतळावर खेळाडूंच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.
विश्वचषकातील सगळ्यात उत्कंठावर्धक सामना म्हणून पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीची दखल घेतली जाते. यंदा १४ ऑक्टोबरला हा सामना दिवस – रात्र रंगणार आहे. सामन्यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्टेडिअम भोवती आणि संवेदनशील भागांमध्ये ११,००० पेक्षा जास्त सुरक्षा सैनिक तैनात असल्यामुळे शहराला छावणीचंच स्वरुप आलं आहे.
त्यामुळे पाक (Ind vs Pak) संघाभोवतीही कडेकोट बंदोबस्त आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या लढतींचा एक कट्टर चाहता बशीर चढ्ढा संघाच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होता. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने यंदा पाक विरुद्ध रोहीत आणि विराट खोऱ्याने धावा करतील अशी आशा बोलून दाखवली.
#WATCH | Pakistan cricket team arrives at Gujarat’s Ahmedabad airport, ahead of their clash against India in ICC World Cup tournament on 14th October pic.twitter.com/yVI6W5MPSW
— ANI (@ANI) October 11, 2023
पाक संघही यंदाच्या विश्वचषकात फॉर्ममध्ये असलेला संघ आहे. नेदरलँड्स आणि श्रीलंकेविरुद्धचे सलग सामने जिंकून त्यांनीही ४ गुण कमावले आहेत. खासकरून, श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात त्यांनी ३४४ धावांचा पाठलाग करताना विजय मिळवलाय. रिझवान महम्मदने १२१ चेंडूंमध्ये १३१ धावा करत पाकला हा विजय मिळवून दिला. त्याच्या साथीला सलामीवीर शफिकनेही शतक झळकावलं.
(हेही वाचा-CM Eknath Shinde : वांद्रे शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करावा)
थोडक्यात, पाकचे तेज गोलंदाज ही संघाची ताकद म्हणून नेहमीच ओळखले जातात. यावेळी त्यांची फलंदाजीही धारदार होतेय. विश्वचषकात सगळ्यात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावावर केला आहे. कर्णधार बाबर आझमचं झटपट बाद होणं ही एकच चिंता सध्या पाक संघासमोर आहे.
पाकिस्तानला अलीकडे झालेल्या आशिया चषकात भारताविरुद्ध सुपर फोर स्तरावर २२० धावांनी पराभव पत्करावा लागला होता. संघाला या पराभवाचा वचपा यावेळी काढायला आहे. तर भारताने आतापर्यंत आयसीसी स्पर्धांमध्ये एकदाही पाकिस्तान विरुद्ध पराभव पत्करलेला नाही. हा लौकीक भारतीय संघाला कायम राखायचा आहे.
भारतीय फलंदाज विरुद्ध पाक तेज गोलंदाज असा हा सामना असणार आहे. पाक संघ – बाबर आझम (कर्णधार), शदाब खान, फखर झमान, इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, महम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिकार अहमद, सलमान अली आघा, महम्मद नवाझ, उझमा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, महम्मद वसिम
भारतीय संघ – रोहीत शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, महम्मद शामी, महम्मद सिराज, शार्दूल ठाकूर.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community