पाकिस्तानच्या श्रीलंकेविरुद्धच्या विजयात मोठी भूमिका निभावणारा फलंदाज महम्मद रिझवान चांगल्या मूडमध्ये आहे. भाराताविरुद्धही हीच रणनीती कामी येईल असा विश्वास त्याला आहे. भारतीय संघ बुधवारी (११ ऑक्टोबर) अफगाणिस्तान बरोबर दोन हात करणार आहे. पण, या सामन्यापूर्वीही चर्चा सुरू आहे ती पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबरच्या आगामी सामन्याची. हा सामना येत्या १४ ऑक्टोबरला अहमदाबाद इथं होणार आहे. भारता प्रमाणेच पाकिस्तानच्या खेळाडूंनाही या सामन्या विषयी सातत्याने विचारलं जात आहे. (Ind vs Pak)
पाकिस्तानच्या श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात त्यांच्यासमोर विजयासाठी ३४५ धावांचं अवघड लक्ष्य होतं. पण, महम्मद रिझवानच्या नाबाद १३१ आणि सलामीवीर अब्दुल्ला शफिकच्या ११३ धावांच्या जोरावर पाकिस्ताने हे लक्ष्य दहा चेंडू राखून पार केलं. या विजयामुळे पाकिस्तानला आत्मविश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया रिझवानने सामन्यानंतर दिली आहे. ‘आम्हाला आमच्या फलंदाजांवर विश्वास होता आणि त्यामुळे ३४५ धावा दुसऱ्या डावात करणं अवघड असलं तरी करू शकू आम्हाला माहीत होतं. आता आमचा पुढचा सामना भारताविरुद्ध आहे. आणि तिथेही आम्ही याच रणनीतीने पुढे जाऊ,’ असं रिझवान म्हणाला. (Ind vs Pak)
पाकिस्तानने या विजयाबरोबरच एकदिवसीय विश्वचषकात नवीन विक्रम रचला आहे. पाठलाग करताना सगळ्यात जास्त धावांचा हा विक्रम आता पाकच्या नावावर लागला आहे. यापूर्वी २०११ च्या विश्वचषकात आयर्लंडच्या ३२८ धावांचं आव्हान इंग्लंडने यशस्वीरीत्या पार केलं होतं. तो विक्रम आता मोडीत निघालाय. पाक संघाला या विजयानंतर आता भारताविरुद्धच्या सामन्याचे वेध लागले आहेत. (Ind vs Pak)
(हेही वाचा – Israel Hamas Conflict : …तर अमेरिकन तळ लक्ष्य केले जातील; हिजबुल्लाहची अमेरिकेला धमकी)
‘आमची रणनीती सोपी होती. शेवटच्या २० षटकांवर आम्ही लक्ष केंद्रीत केलं होतं. तोपर्यंत धावफलक बघायचा नाही, असं मी आणि शफीकने ठरवलं होतं. सुदैवाने शफीकने चांगली पायाभरणी केली. आणि शेवटच्या २० षटकांत १६३ धावा मग आम्ही करू शकलो,’ असं रिझवानने स्पष्ट केलं. फलंदाजीला पोषक खेळपट्टी असेल तर चांगला जम बसल्यानंतर आपण कितीही आव्हान सर करू शकतो, असंच रिझवानचं सांगणं होतं. (Ind vs Pak)
त्यामुळे अहमदाबाद मधील सामना हा भारतीय फलंदाजी विरुद्ध पाक गोलंदाजी असा तर असेलच. शिवाय आता पाकचे फलंदाजही चांगल्या कामगिरीसाठी पुढे सरसावले आहेत, असं चित्र आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना येत्या रविवारी १४ ऑक्टोबरला अहमदाबाद इथं होणार आहे. या सामन्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून अहमदाबाद शहरात ११,००० च्या वर सुरक्षा सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. (Ind vs Pak)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community