- ऋजुता लुकतुके
भारत विरुद्ध कतार फुटबॉल (Ind vs Qatar Football) संघांदरम्यानच्या सामन्यात भारताचा १-२ असा पराभव झाला. पण, कतारचा सामन्यातील पहिला गोल चांगलाच वादग्रस्त ठरला. चेंडू गोलजाळ्यात जाण्यापूर्वीच तो बाद झाला होता, असा भारतीय संघाचा दावा होता. पण, रेफरींनी तो गोल कतारला बहाल केला आणि त्यानंतर भारतीय संघाचा खेळ रुळावरून घसरला. पुढे कतारने ८५ व्या मिनिटाला आणखी एक गोल करत सामना जिंकला. ‘दक्षिण कोरियाचे रेफरी किम वू सुंग यांनी दिलेल्या निर्णयाचा फेरआढावा घेण्यात यावा अशी आमची स्पर्धा आयोजकांना आग्रहाची मागणी आहे,’ असं भारतीय फुटबॉल संघटनेनं आपल्या लेखी तक्रारीत म्हटलं आहे. (Ind vs Qatar Football)
सामन्यात ७४ व्या मिनिटाला तो वादग्रस्त क्षण आला. भारतीय संघ १-० ने पुढे होता. अब्दुल्ला अलाहरकने फ्री किकवर मारलेला फटका युसुफ अयेमकडे गेला आणि अयेमने हेडरवर गोल करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नांत हा चेंडू भारतीय गोल गुरप्रीत सिंग संधूने अडवला आणि गुरप्रीत मैदानात असतानाच चेंडू सीमारेषे पलीकडे जाऊन परत मैदानात आला. या चेंडूवर अयेमने पुन्हा एकदा फटका मारुन गोल केला. खरंतर चेंडू बाहेर गेल्यावर तो बाद होतो. त्यामुळे बाद चेंडूवर गोल होऊ शकत नाही. पण, रेफरींनी तो दिला. सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली आणि झालेल्या गोंधळानंतर भारतीय संघाच्या खेळावर परिणाम झाला. कतारने ८५ व्या मिनिटाला गोल करत २-१ असा विजय मिळवला. भारतीय संघाची मात्र तिसऱ्या फेरीत पोहोचण्याची संधी हुकली. (Ind vs Qatar Football)
We’ll leave it here!#INDQAT #IndianFootball pic.twitter.com/5KhtyOfrvS
— FanCode (@FanCode) June 11, 2024
(हेही वाचा – Western Railwayची भन्नाट आयडिया! आता इंडिकेटर शोधण्याची गरज नाही)
फुटबॉलच्या नियमानुसार, एकदा चेंडू सीमारेषेबाहेर किंवा गोल रेषेबाहेर गेला असेल तर तो बाद होतो आणि नंतर तो त्याच स्थितीत खेळात आणता येत नाही. पण, या नियमाचं पालन या सामन्यात झालं नाही. वरील व्हिडिओतही चेंडू सीमारेषेबाहेर गेलेला दिसत आहे. त्यामुळे हा सामना तिथेच थांबायला हवा होता आणि गुरप्रीतचा हात चेंडूला सगळ्यात शेवटी लागलेला असल्यामुळे कतारला कॉर्नर मिळायला हवा होता. पण, रेफरींनी खेळही थांबवला नाही. उलट कतारला गोल बहाल केला. टीव्ही रिप्लेवर हे स्पष्ट दिसत असल्यामुळे भारताने हे प्रकरण धसास लावण्याचं ठरवलं आहे. (Ind vs Qatar Football)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community