- ऋजुता लुकतुके
केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर भारताचा आधीचा रेकॉर्ड काही फारसा चांगला नाही. भारताने इथं ५ कसोटी गमावल्या आहेत.
भारतीय कसोटी संघ यावेळी दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला तो कसोटी मालिका जिंकण्याच्याच इराद्याने. पण, पहिली कसोटी गमावल्यावर त्याला सुरुंग लागलाय. आणि भारताला निदान मालिकेत बरोबरी साध्य करायची आहे. आणि ते आव्हानही कठीणच आहे. कारण, केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर आतापर्यंत सहा पैकी पाच कसोटी भारताने गमावल्या आहेत.
शिवाय पहिल्या कसोटीतील कामगिरीवरून भारतीय फलंदाजीची बिघडलेली लय आणि गोलंदाजांना न सापडलेला सूर स्पष्ट दिसतो आहे. पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात भारतीय संघ १३१ धावांतच सर्वबाद झाला. ते लक्षात घेऊन केपटाऊनमध्ये दुसऱ्या कसोटीसाठीही हिरवीगार खेळपट्टी तयार ठेवण्यात आली आहे.
अशावेळी सलामीवीर आणि अनुभवी म्हणून रोहित शर्मावर जबाबदारी आहे संघाला चांगली सुरूवात करून देण्याची. आणि भारताला ही कसोटी जिंकायची असेल तर भारताला आशा असेल ती विराट कोहलीकडून. पहिल्या कसोटीतही दुसऱ्या डावात विराटने ७६ धावा केल्या होत्या. आणि आताही दुसऱ्या कसोटीची जोरदार तयारी विराटने केली आहे. नेट्समध्ये प्रत्येक गोलंदाजाला कसं खेळायचं याची रणनीती मागचे काही दिवस तो आखतोय.
(हेही वाचा – Zomato Order : ३१ डिसेंबरला झोमॅटोवर एका माणसाकडून १२५ रुमाली रोटींची ऑर्डर)
आता मैदानावर विराट याची पुनरावृत्ती करू शकला तर भारताला निदान आव्हान उभं करता येईल. शुभमन गिल, श्रेयस अय्यर यांना फलंदाजीतील तांत्रिक चुका टाळाव्या लागतील आणि आखूड टप्प्याच्या चेंडूंना नीट खेळावं लागेल.
गोलंदाजीतही जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराजला इतरांची मदत लागेल. सगळ्यांनी मिळून ठरवलं तरंच भारताला ही कसोटी जिंकता येईल. भारतीय संघात केपटाऊन कसोटीत दोन बदल संभवतात. सेंच्युरियनला पुरता निष्प्रभ ठरलेला प्रसिध कृष्णाच्या जागी आवेश खान संघात येऊ शकतो, तर रवीचंद्रन अश्विनच्या जागी रविंद्र जाडेजा पुनरागमन करू शकतो.
दुसरीकडे डीन एल्गरचा आफ्रिकन संघ विजयाच्या लाटेवर स्वार आहे. अगदी सहाव्या क्रमांकाच्या यानसेन पर्यंत सर्व फलंदाज धावा करतायत. तर नांद्रे बर्गर आणि रबाडा भारतीय फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरतायत. आताही भारताला दुसऱ्या कसोटीत आव्हान उभं करायचं असेल तर या दोघांना नीट खेळून काढावं लागेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community