ऋजुता लुकतुके
दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर आपला पहिला कसोटी सामना (Ind vs SA 2nd Test) खेळणारे शुभमन गिल आणि यशस्वी जयसवाल हे युवा खेळाडू पहिल्या सेंच्युरियन कसोटीत चाचपडताना दिसले. यशस्वी तर यष्टीरक्षकाकडे जाणाऱ्या चेंडूच्या मार्गातून हात काढून घेण्यात कमी पडला. आणि चेंडू ग्लव्ह्जना लागून मागे यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. शुभमन दुसऱ्या डावात चांगल्या सुरुवातीनंतर डावाला आकार देऊ शकला नाही. थोडक्यात, दोघांनाही दक्षिण आफ्रिकेतील तेज गोलंदाजांना साथ देणाऱ्या हिरव्यागार खेळपट्टीवर कसं खेळावं याचा अंदाज बांधता आला नाही.
या पूर्वीच्या आफ्रिका दौऱ्यावर खेळलेला श्रेयस अय्यरही आखूड टप्प्याचे चेंडू खेळण्यात कमी पडला.
३ जानेवारीला केपटाऊनला दुसरी कसोटी सुरू होत आहे. आणि भारतीय संघाचे फलंदाजीतील कच्चे दुवे पाहून आफ्रिकन क्युरेटरने न्यूलँड्सवरील खेळपट्टीवरही चांगलंच गवत ठेवलं आहे. म्हणजेच चेंडूची उसळी अनियमित असणार आणि ही खेळपट्टीही भारतीय फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरणार.
A stunning view here at the Newlands Cricket Ground as #TeamIndia prepare for the 2nd Test match.#SAvIND pic.twitter.com/4NmEMp61Hv
— BCCI (@BCCI) January 1, 2024
अशावेळी कर्णधार रोहित शर्माने युवा खेळाडूंना आपला खेळ उंचावण्याचं आणि इथलं आव्हान समजून घेऊन कामगिरी करण्याचं आवाहन केलं आहे.
सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला, ‘अशा खेळपट्ट्यांवर तुम्ही चांगली कामगिरी केलीत, तर तुमच्या कारकीर्दीत तुम्ही आणखी पुढे जाल. इथं खेळण्याचा शुभमन, यशस्वी आणि श्रेयस यांना पुरेसा अनुभव नाही. पण, हीच वेळ आहे. परदेशी दौऱ्यात आव्हानं वेगळी असतात. तिथेच तुमचा कस लागतो. आव्हानांना उत्तर देऊनच तुम्ही खेळाडू म्हणून मोठे होत असता,’ असं रोहीत फलंदाजांविषयी बोलताना म्हणाला.
गोलंदाजांकडूनही रोहितने चांगल्याच कामगिरीची अपेक्षा केली आहे. पण, पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या प्रसिध कृष्णाची मात्र त्याने पाठराखण केली. ‘पहिली कसोटी खेळताना तुम्ही दडपणाखाली असता. प्रसिधला वेळ दिला गेला पाहिजे,’ असं रोहीत म्हणाला.
दुसरी कसोटी ३ ते ७ जानेवारी दरम्यान केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघात यावेळी दोन बदल संभवतात. निष्प्रभ ठरलेल्या प्रसिध कृष्णाच्या जागी आवेश खान खेळू शकतो. तर अश्विनची जागा रवींद्र जडेजा घेऊ शकतो.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community