ऋजुता लुकतुके
भारतीय खेळाडूंना सेंच्युरियन कसोटीतील (Ind vs SA 2nd Test) पराभव जिव्हारी लागला आहे हे नक्की. कारण, त्या पराभवानंतर एकही दिवस संघातील खेळाडूंनी सरावात विश्रांती घेतलेली नाही. आताही केप टाऊनमध्ये पोहोचलेल्याच दिवशी फलंदाजांनी न्यूलँड्स मैदानावर पहिलं फलंदाजीचं सत्र घेतलं.
विराट कोहली, श्रेयस अय्यर या फलंदाजांचा सराव पाहिला तर भारतीय संघाची रणनीती ठरलेली दिसतेय. फ्रंटफूटवर राहून तेज गोलंदाजांना भिडण्याची तयारी भारतीय फलंदाजांनी केली आहे. यात आघाडीवर होता अर्थातच विराट कोहली. नेट्समध्ये रणनीती आखून सराव करणं ही विराटची खासियत आहे.
(हेही वाचा-Ind vs SA 2nd Test : भारतीय संघ दुसऱ्या कसोटीसाठी केपटाऊनला पोहोचला तो क्षण )
केपटाऊनमध्येही विराटने नांद्रे बर्गरला खेळण्याचा सराव केलेला दिसला. जसप्रीत बुमराह, सिराज, शार्दूल ठाकूर आणि अश्विन यांनी त्याला नेटाने गोलंदाजी केली. पण, भारतीय संघात डावखुरा वेगवान गोलंदाज नसल्यामुळे विराटने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला विनंती करून डावखुरा तेज गोलंदाज थ्रो-डाऊनसाठी मागवला होता.
साधारण २५ मिनिटं त्याने या गोलंदाजाबरोबर सराव केला. थोडक्यात, पहिल्या कसोटीत सात भारतीय फलंदाजांना बाद करणारा नांद्रे बर्गर विराटचं मुख्य लक्ष्य असणार आहे. थ्रो-डाऊन गोलंदाजाला विराटने आरामात खेळून काढलं. आणि अश्विनच्या एका चेंडूवर स्टेडिअममध्ये आवाज घुमेल असा षटकारही लगावला. विराटला फलंदाजीची लय सापडलेली दिसली.
Virat Kohli at nets. Lofts Ashwin for a Six.#IndianCricketTeam #INDvsSA pic.twitter.com/W9MkUGMvwB
— Kushan Sarkar (@kushansarkar) January 1, 2024
दुसरीकडे श्रेयस अय्यरने आखूड टप्प्याचे चेंडू खेळण्याचा जोरदार सराव केला. खेळताना तो थोडा अडखळतही होता. पण, श्रेयसने जिद्द सोडली नाही. कर्णधार रोहित शर्माबरोबर त्याने फलंदाजीवर चर्चाही केली. आधीच्या सराव सत्रात जायबंदी झालेल्या शार्दूल ठाकूरनेही फलंदाजीचा सराव केला.
रोहित शर्मा, के एल राहुल आणि शुभमन गिल यांनीही एका तासापेक्षा जास्त वेळ फलंदाजीचा सराव केला. गोलंदाजीच रोहित शर्मा मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर लक्ष ठेवून होता. पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराहला दुसऱ्या बाजूने चांगली साथ न मिळाल्याचं मत रोहीतने व्यक्त केलं होतं. तर सिराजनेही सातत्यपूर्ण चांगली आणि बळी मिळवणारी कामगिरी केली नाही. त्यामुळे भारतीय संघ प्रसिध कृष्णा किंवा शार्दूल यांना पर्याय शोधत असल्याचं दिसतंय. भारतीय संघात काही बदल निश्चित होतील असं दिसतंय.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community