Ind vs SA, 3rd T20 : द आफ्रिकेचा ११ धावांनी पराभव करत भारताची मालिकेत २-१ ने आघाडी

Ind vs SA, 3rd T20 : तिलक वर्माने टी-२० मधील आपलं पहिलं शतक झळकावलं 

46
Ind vs SA, 3rd T20 : द आफ्रिकेचा ११ धावांनी पराभव करत भारताची मालिकेत २-१ ने आघाडी
Ind vs SA, 3rd T20 : द आफ्रिकेचा ११ धावांनी पराभव करत भारताची मालिकेत २-१ ने आघाडी
  • ऋजुता लुकतुके

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिके दरम्यानचा तिसरा टी-२० सामना घणाघाती फलंदाजीचा ठरला. सामन्यांत दोन्ही संघांनी मिळून २५ षटकारांची आतषबाजी केली. ४० षटकांत मिळून ४२७ धावांची बरसात झाली. पण, अखेर सामना भारतीय संघाने ११ धावांनी जिंकला. आणि मालिकेतही २-१ ने आघाडी घेतली आहे. आता एकच सामना बाकी असल्यामुळे भारताने निदान ही मालिका गमावणार नाही हे निश्चित केलं आहे. (Ind vs SA, 3rd T20)

(हेही वाचा- Amit Shah: CISF च्या पहिल्या महिला बटालियनला केंद्राची मान्यता; ‘या’ सुरक्षा सांभाळणार)

डावखुरा युवा फलंदाज तिलक वर्माचं शतक आणि अर्शदीपची दडपणाखाली अचूक गोलंदाजी हे भारतीय डावाचं वैशिष्ट्य ठरलं. क्लासेन, यानसेन आणि कोत्झीए यांनी फटकेबाजी सुरू केलेली असतानाही अर्शदीपने डोकं शांत ठेवून शेवटची दोन षटकं टाकली. आणि भारताची सामन्यावरील पकड ढिली पडू दिली नाही. तर तिलक वर्माने ५६ चेंडूंत नाबाद १०७ धावा करत भारतीय डावात महत्त्वाची भूमिका बजावली. (Ind vs SA, 3rd T20)

 सेंच्युरियनचं मैदान हे फलंदाजीसाठी नंदनवन मानलं जातं. त्यामुळे नाणेफेक जिंकून आफ्रिकन कर्णधार एडन मार्करमने पहिली गोलंदाजी घेतली. सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर यानसेनने संजू सॅमसनला शून्यावर बाद केलं. पण, तिथून पुढे काहीच मार्करमच्या मनाप्रमाणे घडलं नाही. तिलक आणि अभिषेक यांनी भराभर धावा वाढवल्या. फॉर्ममध्ये नसलेल्या अभिषेकने २५ चेंडूंत ५० धावा केल्या. दोघांनी संघाची धावसंख्या १०७ वर नेली. अभिषेक बाद झाल्यावरही तिलकची फटकेबाजी सुरूच होती. हार्दिक पांड्याने १८ आणि रमणदीपने १५ धावा करत तिलकला साथ दिली. भारताने निर्धारित २० षटकांत ६ बाद २१९ धावा केल्या. (Ind vs SA, 3rd T20)

 तिलक वर्मा टी-२० मध्ये पहिल्या दहांत असलेल्या संघाविरुद्ध शतक झळकावणारा सगळ्यात तरुण भारतीय फलंदाज ठरला. शिवाय मैदानात चारही बाजूला फटके खेळण्याचं कसब त्याने दाखवून दिलं. सुरुवातीला २२० धावांचं आव्हान पुरेसं वाटत होतं. कारण, वरुण चक्रवर्तीने पुन्हा एकदा सुरुवातीलाच दोन बळी मिळवत आफ्रिकन संघाची अवस्था ४ बाद ८४ केली होती. पण, त्यानंतर हेनरिक क्लासेन, मार्को यानसेन यांनी डाव फिरवला. चक्रवर्तीला सलग तीन षटकार खेचत क्लासेनने त्याची लयच बिघडवली. तर तो ४१ धावांवर बाद झाल्यावर यानसेनने फटकेबाजी सुरूच ठेवली. ५ षटकार आणि ४ चौकारांची आतषबाजी करत त्याने १७ चेंडूंत ५४ धावा ठोकल्या. आणि आफ्रिकन संघाला अक्षरश: विजयाच्या जवळ आणलं. पण, आवश्यक धावगती वाढत होती. त्यामुळे मोठे फटके खेळण्याच्या नादात गडी बादही झाले. अखेर आफ्रिकन संघ २० षटकांत ७ बाद २०८ धावाच करू शकला. मालिकेत आता भारताकडे २-१ ने आघाडी आहे. (Ind vs SA, 3rd T20)

चौथा टी-२० सामना १५ तारखेला जोहानसबर्ग इथं होणार आहे. (Ind vs SA, 3rd T20)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.