ऋजुता लुकतुके
गेबेखामधील दुसऱ्या टी-२० (Ind vs SA 3rd T20) सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर रात्री भारतीय संघाला एका झंझावाताचा सामना मैदानावर करावा लागला. हा झंझावात होता दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांचा. हेनरिक्स, ब्रिट्झ, क्लासेन आणि डेव्हिड मिलर या सगळ्यांनीच भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा गबेखामध्ये दाखवून दिल्या. सिराज, अर्शदीप आणि मुकेश खूप चुकले असं नाही. पण, फटकेबाजीला आवर घालण्यात नक्की कमी पडले.
त्यामुळे आता मालिकेत बरोबरी मिळवायची असेल तर एरवी फलंदाजांना साथ देणाऱ्या जोहानसबर्गच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना आपला खेळ उंचवावाच लागेल.
बाकी एका पराभवानंतरही भारतीय संघातील वातावरण चांगले आणि सकारात्मक आहे ही जमेची गोष्ट. बीसीसीआयने जोहानसबर्गमध्ये संघ पोहोचला तो व्हीडिओ ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. आणि त्यातून संघातील खेळीमेळीचं वातावरणच दिसतं.
#TeamIndia have arrived in Johannesburg for the 3rd and final T20I. #SAvIND pic.twitter.com/4aabOX0tVN
— BCCI (@BCCI) December 13, 2023
या भारतीय संघात जसप्रीत बुमरा आणि महम्मद शामी खेळत नाहीएत. आणि त्यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची मदार आहे ती अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमारवर. या दोघांनाही टी-२० विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळवण्याचीही संधी आहे.
पण, झालेल्या एका सामन्यात तरी दोघं छाप पाडू शकलेले नाहीत. अर्शदीपने पहिल्या दोन षटकांत तर १५.५० सरासरीने धावा दिल्या. मुकेश कुमारने दोन बळी टिपले. तरी त्याच्या षटकांतही हेनरिक्स आणि मार्करमने धावा लुटल्याच. खरंतर मुकेश कुमार हा भारतीय निवड समितीला दीर्घ पल्ल्याचा आणि तीनही प्रकार खेळू शकेल असा गोलंदाज वाटतो. त्याच्याकडून बीसीसीआयच्या अपेक्षा आहेत. पण, आता मुकेशला कामगिरीने हे सिद्ध करावं लागेल.
आणि त्यासाठी आता फारशा संधी नाहीएत. त्यामुळे जोहानसबर्ग इथं हे दोघे गोलंदाज तसंच कुलदीप आणि संधी मिळाली तर रवी बिश्नोईवर लक्ष असेल. रवी बिश्नोई टी-२० क्रिकेटमधील सध्याचा (Ind vs SA 3rd T20) अव्वल गोलंदाज आहे. त्याला जोहानसबर्गमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण, सर्व खेळाडूंना आजमावण्याचा प्रशिक्षक द्रविड यांचा मानस असेल.
बाकी भारतीय संघाची फलंदाजी चांगली होतेय. सलामीवीर झटपट बाद झाल्या नंतरही तिलक वर्मा, सुर्यकुमार आणि रिंकू सिंग यांनी धावा केल्या. आता यशस्वी जयसवाल आणि शुभमन गिल यांच्याकडून चांगल्या सलामीची अपेक्षा संघाला असेल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ घरच्या मैदानावर झकासच खेळतोय. एकाच सामन्यात पण, सर्वच फलंदाजांनी आपला फॉर्म दाखवून दिलाय. आणि कोत्झीए, जानसेन यांची गोलंदाजीही जमून आली आहे. तर शाम्सी फिरकी गोलंदाजीने कमाल करताना दिसतोय.
तरीही दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. आणि म्हणूनच जोहानसबर्गचा सामना रंगतदार होईल हे नक्की.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community