Ind vs Sl Preview : भारताला खुणावतेय उपांत्य फेरीतील जागा, तर चाचपडणाऱ्या श्रीलंकेची टिकून राहण्यासाठी धडपड

भारत आणि श्रीलंकेचे संघ बुधवारी मुंबईत आमने सामने येतील तेव्हा दोन्ही संघांची परिस्थिती अगदी टोकाची वेगळी असेल. कारण, भारताला सलग सातवा विजय मिळवायचाय. तर श्रीलंकेला या स्पर्धेत सात पराभव होऊ द्यायचे नाहीत.

161
Ind vs Sl Preview : भारताला खुणावतेय उपांत्य फेरीतील जागा, तर चाचपडणाऱ्या श्रीलंकेची टिकून राहण्यासाठी धडपड
Ind vs Sl Preview : भारताला खुणावतेय उपांत्य फेरीतील जागा, तर चाचपडणाऱ्या श्रीलंकेची टिकून राहण्यासाठी धडपड
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि श्रीलंकेचे संघ बुधवारी मुंबईत आमने सामने येतील तेव्हा दोन्ही संघांची परिस्थिती अगदी टोकाची वेगळी असेल. कारण, भारताला सलग सातवा विजय मिळवायचाय. तर श्रीलंकेला या स्पर्धेत सात पराभव होऊ द्यायचे नाहीत. भारत आणि श्रीलंका हे दोन संघ बुधवारी २ नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर आमने सामने येतील तेव्हा सगळ्यांना २०११ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आठवल्याशिवाय राहणार नाही. मैदानही तेच आहे. त्यामुळे तर ही आठवण निघणारच. (Ind vs Sl Preview)

त्या अंतिम सामन्यात लंकन संघाने पहिली फलंदाजी करताना २७४ धावा केल्या होत्या. महेला जयवर्धनेचं सुरेख शतक आणि कुमार संगकाराच्या ४८ धावा यांनी तो डाव सजला होता आणि त्यानंतर भारतीय डावात सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाल्यामुळे वानखेडे मैदानावर काही काळ स्मशान शांतता पसरली होती. पण, पुढे गौतम गंभीरच्या ९७ धावा आणि महेंद्र सिंग धोनीच्या नाबाद ९१ धावा यामुळे भारतीय संघाने तो ऐतिहासिक विजय साकारला. (Ind vs Sl Preview)

धोनीने नुवान कुलसेकराला मारलेला विजयी षटकार मुंबईकर प्रेक्षक अजून विसरलेले नाहीत. या सामन्यानंतर आता पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. बुधवारचा सामना अंतिम फेरीचाही नाही. दोन्ही संघही बदलले आहेत. तेव्हाच्या संघातील फक्त विराट कोहली आता खेळतोय आणि सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे त्या सामन्यानंतर भारतीय संघ क्रिकेटमध्ये सातत्याने वर चढत गेला आहे. पुढच्या प्रत्येक विश्वचषकात संघाने किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. आणि कसोटी विश्वविजेतेपदाची अंतिम फेरीही संघाने दोनदा गाठलीय. (Ind vs Sl Preview)

याउलट भारतीय उपखंडात एकेकाळी ताकद म्हणून ओळखला जाणारा लंकन संघ आता जागतिक क्रमवारीतही सातव्या स्थानावर फेकला गेलाय आणि या स्पर्धेतही फक्त दोन विजय मिळवत संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ही भारत, श्रीलंका लढत ही भारतासाठी वर्चस्व राखण्याची तर श्रीलंकेसाठी अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे. भारतीय संघाचा चांगला जम बसलाय आणि फारसे बदल या सामन्यातही संभवत नाहीत. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर अडखळतोय. पण, संघ प्रशासनाने त्याच्यावर विश्वास दाखवलाय आणि आताही तो खेळण्याचीच लक्षणं आहेत. शिवाय घरच्या मैदानावर तो चांगली कामगिरी करेल अशीच अपेक्षा आहे. (Ind vs Sl Preview)

(हेही वाचा – MNS : राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी मांडली मनसेची भूमिका; टोल, मुंबई-गोवा महामार्ग आणि मराठा आरक्षण…सगळे काही रोखठोक)

भारतीय संघात यावेळी श्रेयससह, रोहीत शर्मा, सुर्यकुमार यादव आणि शार्दूल ठाकूर असे चार मुंबईकर आहेत. शिवाय विराट कोहलीही मुंबईतच राहतो. त्यामुळे घरच्या मैदानावर हे खेळाडूही चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतील. विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या ४९ एकदिवसीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याच्या उंबरठ्यावर आहे. हा विक्रम साक्षात सचिन तेंडुलकरसमोर करण्याची संधी त्याच्या समोर आहे. तर मोहम्मद शामी, जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादव यांच्याकडूनही भारताला आशा आहेत. (Ind vs Sl Preview)

याउलट श्रीलंकेला आधी दुखापतींनी आणि मग सीनिअर खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे सतावलंय. पण, युवा समरविक्रमा आणि निसांका यांनी सीनिअर खेळाडूंच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी केलीय आणि निसंका तर शुभमन गिलच्या पाठोपाठ यावर्षी १,००० एकदिवसीय धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. अनुभवी खेळाडू नसले तरी श्रीलंकेचा संघ हा ‘टीम-टू-बिट’ म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळे बुधवारीही भारतीय संघाला कुणाला हलकं लेखून चालणार नाही. वानखेडे स्टेडिअमची नव्याने तयार झालेली खेळपट्टी मोठे फटके खेळणाऱ्या फलंदाजांना साथ देते असं या स्पर्धेत दिसून आलं आहे. त्यामुळे या सामन्यातही प्रेक्षकांनाच काही झेल पकडावे लागणार आहेत, असं दिसतंय. पण, त्यामुळे मोठ्या धावसंख्येचा हा सामना असेल. दिवाळी आधी भरपूर फटाके पाहायला मिळणार आहेत. (Ind vs Sl Preview)

हेहूी पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.