रोहित शर्माचे वादळी शतक आणि विराट कोहलीचा फिनिशिंग टच, या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा ८ विकेट आणि १५ षटके राखून पराभव केला. अफगाणिस्तानने दिलेले २७३ धावांचे आव्हान अवघ्या ३५ षटकांमध्ये सहज पार केले. भारताचा विश्वचषकातील हा सलग दुसरा विजय होय. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभ केला होता. बुधवारी अफगाणिस्तान संघाविरोधात बाजी मारली. भारताचा पुढील सामना १४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधात अहमदाबाद येथे होणार आहे. (World Cup 2023 )
भारताच्या रोहित शर्मानं कर्णधारास साजेशी खेळी उभारून अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक साजरं केलं आहे. या सामन्यात अफगाणिस्ताननं भारताला विजयासाठी २७३ धावांचं आव्हान दिलं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मानं ईशान किशनच्या साथीनं भारताला शतकी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात रोहितला भोपळाही फोडता आला नव्हता. त्या अपयशाची त्यानं आज अफगाणिस्तानविरुद्ध शतकानं भरपाई केली. रोहित शर्माचं वन डे कारकीर्दीतलं हे ३१ वे आणि विश्वचषकातलं सातवं शतक ठरलं. त्याच्या ६३ चेंडूंमधल्या शतकाला १२ चौकार आणि चार षटकारांचा साज आहे. (World Cup 2023 )
(हेही वाचा : Senior Citizens Day Care Center : वृध्दांसाठी मुंबईत लवकरच डे केअर सेंटर)
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमच्या सपाट खेळपट्टीवर भारताच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानला२७२ धावांत रोखले. त्यानंतर रोहित शर्मा याने वादळी फलंदाजी करत हे आव्हान सहज पार करण्यास सिंहाचा वाटा उचलला. २७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी वादळी सुरुवात केली. विशेषकरुन रोहित शर्मा याने धावांचा पाऊस पाडला. रोहितपुढे अफगाणिस्तानची गोलंदाजी अतिशय दुबळी आणि कमकुवत जाणवत होती. रोहितच्या वादळात अफगाणिस्तानचे सर्वाच गोलंदाज उडून गेले. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी अवघ्या १८. ४ षटकात १५६ धावांची सलामी दिली. दोघांनीही अफगाण गोलंदाजांचा समाचार घेतला.