ऋजुता लुकतुके
अखिल भारतीय टेनिस महासंघाने डिसेंबर २०२४ पर्यंत भारतीय टेनिस संघाचे कर्णधार म्हणून रोहित राजपाल यांची फेरनियुक्ती केली आहे. हा निर्णय अपेक्षितच होता. राजपाल यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीचं मूल्यमापन केल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचं टेनिस महासंघाने (India Davis Cup) म्हटलं आहे.
‘राजपाल यांच्या कामगिरीचं बारकाईने मूल्यमापन केल्यानंतर तेच या पदासाठी योग्य आहेत, याची खात्री कार्यकारी मंडळाला पटली. त्यामुळे त्यांची फेरनियुक्ती आम्ही करत आहोत. राजपाल यांचे नेतृत्व गुण, खेळाची सर्वंकष जाण आणि खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेण्याची हातोटी, यामुळे कार्यकारिणीचा राजपाल यांच्यावर विश्वास बसला,’ असं महासंघाने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
Rohit Rajpal was reappointed as the non-playing captain of the Indian Davis Cup team until the end of 2024 on Saturday by the All India Tennis Association (AITA).#tennishttps://t.co/m253JArnIe
— The Bridge (@the_bridge_in) November 12, 2023
डेव्हिस चषकात (India Davis Cup) संघाबरोबर न खेळणारा कर्णधार असतो, जो मैदानावर प्रत्यक्ष उतरत नाही. पण, रणनीती आखणं आणि खेळाडूंना मार्गदर्शन करणं ही जबाबदारी तो उचलत असतो. संघाचा तो मुख्य प्रशिक्षक असतो. पण, डेव्हिस चषक स्पर्धेत अशा व्यक्तीला ऩॉन प्लेइंग कॅप्टन म्हटलं जातं.
२०१९ मध्ये राजपाल पहिल्यांदा भारतीय संघाचे कर्णधार झाले. तेव्हा महेश भूपतीने पाकिस्तान विरुद्धचा सामना तिथे जाऊन खेळायला नकार दिला होता. भारतीय संघाची बाजू राजपाल यांच्या मदतीने टेनिस महासंघाने आंतरराष्ट्रीय संघटनेकडे मांडली. आणि त्यामुळे हा सामना पाकिस्तान ऐवजी कझाकिस्तानमध्ये हलवण्यात आला.
त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ क्रोएशिया, फिनलंड, डेन्मार्क आणि नॉर्वे या तगड्या संघांविरुद्ध खेळला आहे. यातील डेन्मार्कचा सामना फक्त भारताने जिंकला आहे. यावर्षी राजपाल यांच्या नेतृत्वाखाली भारताने मोरोक्कोचा ४-१ असा पराभव करत जागतिक गटात पुन्हा एकदा स्थान मिळवलं आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community