- ऋजुता लुकतुके
२०२३-२५ च्या आयसीसी कसोटी अजिंक्यपदाचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ अंतिम फेरीत पोहोचले आहेत. भारताविषयी बोलायचं तर दिवाळीच्या दरम्यान मायदेशात न्यूझीलंड विरुद्धची मालिका होती तोपर्यंत संघासाठी सगळं काही आलबेल होतं. क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थान राखून होता. पण, ही मालिका ०-३ ने भारताने गमावली आणि त्यानंतर पिछेहाट सुरू झाली. बोर्डर-गावस्कर मालिका १-३ ने गमावल्यावर आता भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. (India Test Schedule)
आता भारतीय संघ आपली पुढील कसोटी खेळणार आहे तो जुलै महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर. इंग्लंड विरुद्ध भारत मालिकेनं भारतासाठी नवीन कसोटी हंगाम सुरू होईल. पण, हे आव्हानही सोपं असणार नाही. कारण, सेना (द आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) अशा सगळ्याच तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी भारताला दोन हात करायचे आहेत. (India Test Schedule)
(हेही वाचा – Raj Thackeray यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; म्हणाले, विधानसभेत झाले ते विसरा आणि…)
एकूण १८ कसोटी नवीन हंगामात भारतीय संघ खेळेल आणि याची सुरुवात होईल जुलै महिन्यात पतौडी करंडकाने. ५ सामन्यांची ही मालिका इंग्लंडमध्ये खेळवली जाणार आहे. या आधीच्या दौऱ्यात भारतीय संघाने इथे चांगली कामगिरी केली होती. पण, त्यानंतर बॅझबॉल क्रिकेटचा जन्म झाला आणि इंग्लिश संघाला मायदेशात हरवणं आता कठीण आव्हान बनलं आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. प्रत्येकी २ कसोटींच्या या मालिका असतील. त्यातच २०२५ वर्ष संपेल आणि त्यानंतर काही काळासाठी भारतीय संघ रेडबॉल क्रिकेटपासून दूर असेल. (India Test Schedule)
ऑगस्ट २०२६ मध्ये भारतीय संघ शेजारी देश श्रीलंकेचा दौरा करेल. इथंही दोन कसोटी खेळवल्या जाणार आहेत. आणि त्यानंतर भारतीय संघ लगेचच न्यूझीलंडला रवाना होईल. या मालिकेत भारताला मायदेशातील पराभवाचं उट्टं काढण्याची संधी असेल आणि तिथून परत आल्यानंतर २०२७ च्या सुरुवातीला भारतीय संघ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. अर्थात, ही मालिका बोर्डर-गावस्कर चषकाचा भाग असेल आणि यावेळी ती भारतात पार पडेल. हातातून गेलेला चषक पुन्हा आपल्या नावावर करण्याची संधी भारताला असेल. (India Test Schedule)
(हेही वाचा – Delhi Assembly Elections ची तारीख जाहीर)
भारतीय संघाचं कसोटी अजिंक्यपद २०२५-२७ चं वेळापत्रक
जुलै, ऑगस्ट २०२५ – इंग्लंड दौरा (५ कसोटी)
ऑक्टोबर २०२५ – वेस्ट इंडिजचा भारत दौरा (२ कसोटी)
नोव्हेंबर – डिसेंबर २०२५ – दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा (२ कसोटी)
ऑगस्ट २०२६ – श्रीलंका दौरा (२ कसोटी)
ऑक्टोबर, डिसेंबर २०२६ – भारताचा न्यूझीलंड दौरा (२ कसोटी)
जानेवारी, फेब्रुवारी २०२७ – ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (५ कसोटी)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community