ऑस्ट्रेलियाचा भारतावर 9 गडी राखून दणदणीत विजय; नॅथन लाॅयन विजयाचा शिल्पकार

तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. या कसोटी विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. दरम्यान, चार सामन्यांच्या बाॅर्डर गावस्कर कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. या विजयामुळे चौथ्या कसोटीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कांगारुंसाठीही ही कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर भारतीय संघाचा चौथा सामना जिंकून जिंकण्याचा प्रयत्न करेल.

इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या 76 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने केवळ एक गडी गमावून ते लक्ष्य सहज गाठले. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी भारतीय संघ अपयशी ठरला. भारतीय संघाचे सर्व प्लॅनिंग फोल ठरले. चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.

( हेही वाचा: IND VS AUS : ११ धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचे ६ खेळाडू केले बाद, तिसऱ्या कसोटीत भारताची स्थिती काय? )

ऑस्ट्रेलियाची आक्रमक फलंदाजी

भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने दिवसाच्या दुस-या चेंडूवर उस्मान ख्वाजाला 0 धावांवर बाद केले त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र 12 व्या षटकात चेंडू बदलण्यात आला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव पलटला. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लबुशेन यांनी आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड ( 49 धावा) आणि मार्नस लबुशेन (28 धावा) नाबाद राहिले.

चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकानंतरही भारतीय संघ दुस-या डावात नॅथन लियाॅनच्या (8/64) फिरकीसमोर 163 धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी केवळ 76 धावांचे लक्ष्य ठेवले. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा झुंज दिली आणि पुजारा ( 142 चेंडूत 59, पाच चौकार, एक षटकार) शिवाय एकही फलंदाज लियाॅनसमोर टिकू शकला नाही. लिआॅनने सामन्यात 99 धावांत 11 विकेट्स घेतल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here