गुजरातमध्ये कोरोना रुग्ण वाढले… उरलेल्या सामन्यांत प्रेक्षकांना प्रवेश नाही!

प्रेक्षकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याने, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याचे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष धनराज नथवानी यांनी सांगितले.

कोरोना विषाणूची आता वर्षपूर्ती होत आहे. पण प्रदीर्घ अशा लॉकडाऊन नंतर आता पुन्हा एकदा देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रासोबतच अनेक राज्यांमध्ये आता निर्बंध घालण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच आता भारत आणि इंग्लंडमधील उर्वरित तीन टी-२० सामन्यांसाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गर्दी आणि नियमांचे उल्लंघन

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे होणारे भारत आणि इंग्लंडमधील १६, १८ आणि २० मार्च रोजी होणारे तीन टी-२० सामने हे प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय गुजरात क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. गुजरातमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. टी- मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत प्रेक्षकांच्या गर्दीमुळे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा उडाला. दुस-या टी-२० सामन्याच्या वेळी जवळपास ६७ हजार प्रेक्षक उपस्थित होते. प्रेक्षकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याने, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याचे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष धनराज नथवानी यांनी सांगितले. बीसीसीआयशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचाः राज्यात कोरोनाचे नवे निर्बंध! जाणून घ्या!)

पैसे मिळणार परत

उर्वरित तीन सामन्यांसाठी प्रेक्षकांनी घेतलेल्या तिकीटांचे पैसे परत करण्यासाठी गुजरात क्रिकेट असोसिएशन कडून एक धोरण जाहीर करण्यात येणार आहे. तसेच मोफत प्रवेशिका मिळालेल्या प्रेक्षकांना मैदानात न येण्याची विनंती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या निर्णयाबाबत गुजरात क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे राज्यात पुन्हा डोके वर काढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाशी सामना करायला मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी गुजरात राज्यात तब्बल ८९० कोरोना रुग्ण आढळून आले. ही संख्या २०२१ मधील सर्वाधिक संख्या असल्याचे म्हटले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here