टी-20 विश्वचषकात भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला आहे. भारताने 4 गडी राखत पाकिस्तानवर मात केली आहे. त्यामुळे भारतीयांना टीम इंडियाने विजयाचे दिवाळी गिफ्ट दिले आहे. विराट कोहली हा या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. हा विजय मिळवत भारताने मागील टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.
थरारक विजय
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर रंगलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने भारतासमोर 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते. फलंदाजी करताना भारताची सुरुवात डळमळीत झाली. अवघ्या 31 धावांवर भारताने आपले चार गडी गमावले. त्यानंतर विजयाचा कोहिनूर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचा डाव सावरला. त्यांनी 5व्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली. महम्मद नवाजच्या शेवटच्या षटकात भारताला जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असताना हार्दिक पांड्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. शेवटच्या चेंडूवर भारताला जिंकण्यासाठी एका धावेची गरज असताना अष्टपैलू फलंदाज रविचंद्रन अश्विन याने चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.
किंग कोहली विजयाचा शिल्पकार
किंग कोहली या विजयाचा खरा शिल्पकार ठरला आहे. कोहलीने 4 षटकार आणि 6 चौकारांसह 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. त्यामुळे एकप्रकारे कोहलीने आपल्या टीकाकारांना आपल्या बॅटने सडेतोड उत्तर दिले आहे.
Join Our WhatsApp Community