भारत-श्रीलंका दुसरी कसोटीः ‘बूम-बूम’ बुमराहची जादू! ‘या’ दिग्गजांना टाकले मागे

या सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने श्रीलंकेचे 5 गडी बाद केले आहेत.

113

भारत आणि श्रीलंकेदरम्यान बंगळूर येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या डे-नाईट पिंक बॉल सामन्यावर भारताने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पहिल्या डावात श्रीलंकेचा केवळ 109 धावांत धुव्वा उडवत भारताने या सामन्यात मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नवा विक्रम रचला आहे.

या सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने श्रीलंकेचे 5 गडी बाद केले आहेत. डे-नाईट क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा बुमराह हा पहिला खेळाडू ठरला आहे. यासोबतच बुमराहने अनेक भारतीय खेळाडूंचा विक्रम देखील मोडला आहे.

(हेही वाचाः मध्य रेल्वे ‘अशी’ होतेय मालामाल!)

बुमराहची धडाकेबाज कामगिरी

जसप्रीत बुमराहने या सामन्याच्या पहिल्या डावात भेदक गोलंदाजी करत श्रीलंकेच्या 5 खेळाडूंना माघारी पाठवले. कुशल मेंडिस, लाहिरू थिरिमाने, अँजेलो मॅथ्यूज आणि डिकवेलसारख्या फलंदाजांना बाद करत त्याने 10 षटकांत 24 धावा देत 5 गडी टिपण्याची कामगिरी केली. डे-नाईट कसोटी सामन्यात अशी कामगिरी करणारा बुमराह हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. इतकंच नाही तर कसोटी क्रिकेटमध्ये भारतात पहिल्यांदाच त्याने 5 विकेट्सची कमाई केली आहे.

दिग्गजांचे विक्रम मोडीत

बुमराहच्या या कामगिरीमुळए आता तो सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक 5 बळी घेणारा वेगवान गोलंदाज ठरला आहे. 29 कसोटी सामन्यांत 8 वेळा 5 प्लस विकेट्स घेत त्याने कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. तर इरफान पठाणला त्याने मागे टाकले आहे. इरफानने 29 कसोटीत 7 वेळा 5 प्लस विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने 2018 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तसेच सर्वात कमी धावा देत 5 गडी बाद करण्याचा इशांत शर्माचा विक्रम देखील बुमराहने मोडीत काढला आहे. इशांतने 2015 साली श्रीलंकेविरुद्ध 54 धावा देत 5 गडी बोद केले होते, तर बुमराहने केवळ 24 धावा देत ही किमया साधली आहे.

(हेही वाचाः कोकणातील ‘शिमगा’ म्हणजे महाराष्ट्राचे भूषण !)

भारताला मोठी आघाडी

बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर भारत आणि श्रीलंका संघांमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी कारण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव केवळ 252 धावांत आटोपला. पण गोलंदांजांनी चमकदार कामगिरी करत श्रीलंकन फलंदाजांच्या काठ्या उडवल्या. भारतीय गोलंदाजांच्या भेदक मा-यापुढे श्रीलंकेच्या संघाला केवळ 109 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे कमी धावा असताना देखील भारताला 143 धावांची मोठी आघाडी मिळाली. पहिल्या डावात फलंदाजीमध्ये भारताकडून श्रेयस अय्यरच्या 92 धावांच्या उल्लेखनीय खेळीमुळे भारताला 252 धावांचा आकडा गाठता आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.