T20 World Cup, Ind vs SA : १३ वर्षांचा दुष्काळ संपला, भारताला टी-२० विजेतेपद

T20 World Cup, Ind vs SA : अक्षरच्या एका षटकाने सामना बिघडवला, बुमराने परत आणला

149

. ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत शेवटच्या षटकापर्यंत रंगला तर दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचं काय होतं याचा अनुभव केंजिग्टन ओव्हलमध्ये जमलेल्या ३०,००० च्या वर प्रेक्षकांनी आणि टीव्हीवर हा सामना पाहणाऱ्या करोडोंनी घेतला. आणि अशा सामन्यात खेळाडूंचा कस लागत असला तरी ठरतं की खरे चॅम्पियन कोण. आणि जसप्रीत बुमरा, सुर्यकुमार यादव, विराट कोहली या सगळ्यांनी दाखवून दिलं की, ते चॅम्पियन आहेत. आणि चॅम्पियन संघाचा भाग आहेत.

दक्षिण आफ्रिकन संघाला अंतिम फेरीत त्यांनी ७ धावांनी हरवलं. विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहून विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ पहिला संघ आहे. खरंतर अंतिम सामन्यातही भारताची परीक्षा पाहणारे अनेक क्षण आले. सगळ्यात आधी रोहीत शर्मा (९), रिषभ पंत (०) आणि सुर्यकुमार यादव (३) धावांवर बाद झाल्यामुळे भारताची सुरुवात डळमळीत झाली होती. पण, तेव्हा विराट कोहली (७६) आणि अक्षर पटेल (४७) संघासाठी खेळपट्टीवर उभे राहिले. शिवम दुबेनंही २७ धावा करत भारताला ६ बाद १७६ अशी धावसंख्या रचून दिली.

त्यानंतर भारताचा भरवसा होता तो कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंवर. पण, कुलदीपच्या ४ षटकांत ४५ तर अक्षरच्या ४ षटकांत ४९ धावा निघाल्या. पण, अर्शदीप आणि बुमरा अशावेळी टिच्चून उभे राहिले. खरंतर अक्षरच्या १५ व्या षटकांत क्लासेनने २३ धावा झोडल्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर गेला होता. पण, त्या कठीण परिस्थितीतून बुमरानेच भारताला बाहेर काढलं. आफ्रिकन संघाला २४ चेंडूंत २३ धावा हव्या असताना त्याने एका षटकात फक्त एक धाव देत एक बळीही मिळवला. आणि तेव्हापासून सामना भारताच्या बाजूने खऱ्या अर्थाने झुकला.

शेवटच्या संघात आफ्रिकन संघाला १५ धावा हव्या असताना डेव्हिड मिलरचा सीमारेषेवर सुर्यकुमार यादवने जो झेल पकडला तो ही चॅम्पियन खेळाडूला साजेशा होता. एरवी तो षटकार गेला असता. पण, सुर्यकुमारने चेंडू आधी सीमारेषेच्या आत टाकला. आणि मग आता येत तो पुन्हा झेलला. तिथेच भारताचं विजेतेपद निश्चित झालं. हार्दिकने शेवटचं षटक शांतपणे टाकत मग विजय भारताच्या नावावर केला.

२०११ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर हुलकावणी देणारं आयसीसी विजेतेपद अखेर भारताने पटकावलं.

विराट सामनावीर

विराटला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. आणि त्याने निवृत्ती जाहीर केली. ‘हा माझा भारतासाठी शेवटचा सामना होता. मी शेवटचा टी-२० विश्वचषक खेळत होतो. त्यामुळे काहीतरी खास करून जायचं असं वाटत होतं. त्याचा परिणाम खेळावर दिसला, असे विराट म्हणाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.